योगा रोजच्या जीवनाचा भाग बनवा- बराक ओबामा

वॉशिंग्टन दि.१ -योग ही उत्तम शारीरिक कसरत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दररोज योग करावा असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल व्हाईट हाऊसमध्येच बोलताना केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही इस्टर एग रोल फेस्टीव्हल व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आला होता तेव्हा निमंत्रित पालक आणि लहान मुलांसमोर ओबामा बोलत होते. या निमित्त मुलांसाठी खास योगा गार्डनचे आयोजन केले गेले होते. विशेष म्हणजे योग हा हिंदुत्वाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी असल्याने शाळेत तो शिकविला जाऊ नये यासाठी कॅलिफोर्नियातील शाळेने न्यायालयात धाव घेतल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी योगाचा पुरस्कार करण्याचे आवाहन केले आहे.

खुद्द प्रसिडेंट आणि फर्स्ट लेडी मिशेल ओबामा हे दोघेही योगाचे अभ्यासक आहेत. योगा गार्डनच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रशिक्षित शिक्षकांकडून योगाचे धडे घेण्याचे आवाहन उपस्थित बालक पालकांना केले. अशा प्रकारे योगा गार्डन व्हाईट हाऊसमध्ये मागेही भरविली गेली होती.  ’ बी हेल्दी, बी अॅक्टीव्ह, बी यू’ या थीमखाली झालेल्या या कार्यक्रमात देशभरातील मुलांना योगा करण्याचे आवाहन केले गेले.

यावेळी बोलताना मिशेल ओबामा यांनी देशाचे ढासळते आरोग्य आणि वाढत चाललेल्या आरोग्य खर्चावर नियंत्रणासाठी योगा फार उपयुक्त असल्याचे सांगितले तर हा प्रकार कोणताही पैसा खर्च न करता, घरच्या घरी आणि स्वतःच करता येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ओबामा यांनी या निमित्ताने प्रेसिडेन्शियल अॅक्टीव्ह लाईफ अॅवॉर्ड देण्यात येणार असल्याचेही जाहीर केले.

कॅलिफोर्नियातील एका शाळेने शाळेत योग शिकविला जाऊ नये कारण तो हिंदूत्वाचा प्रसार करण्यासाठी आहे असे कारण देऊन त्याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. मात्र या न्यायालयाचे न्यायाधीश स्वतःच योग करणारे असून ते बिक्रम योग करतात असेही समजते.

Leave a Comment