मुंबई पोलिसांच्या आदेशाने मुस्लिम समाजात रोष

मुंबई: मुस्लिम महिलांमध्ये शिक्षण प्रसाराचे कार्य करणाऱ्या एका शिक्षण संस्थेमार्फत जिहादी चळवळीसाठी युवतींना तयार करण्याचे काम केले जात असून या शैक्षणिक संस्थेतील घडामोडींवर कडक नजर ठेऊन राहण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून सर्व पोलिस ठाण्यांना जरी करण्यात आले आहेत. हे आदेश हा संस्था आणि मुस्लीमांविरोधी कट असून या प्रकरणी पोलिसांनी माफी मागावी; अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

‘गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ आणि या संस्थेची मातृसंस्था असलेली ‘जमात ए इस्लामी हिंद’ या संस्थेमार्फत मुस्लिम मुलींना शिक्षणाची सुविधा देण्याचे काम केले जाते. मात्र या शिक्षणाची नावाखाली शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना कट्टर धार्मिकता वादाचे प्रशिक्षण देऊन त्यांना जिहादसाठी तयार केले जात असल्याचे मुंबई पोलिसांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. या आदेशाने केवळ मुंबईतच नव्हे तर देशभर खळबळ माजली असून या आदेशाचे स्पष्टीकरण करताना मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत.

हा आदेश मुस्लिम विरोधी कट असून पोलिसांनी या आदेशाबाबत माफी मागण्याची मागणी संस्थेने केली आहे; तर पोलिसांनी गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘केवळ अंतर्गत बाब’ म्हणून हे आदेश जारी केल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment