‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ ते नुकत्याच राष्ट्रीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणा-या ‘अनुमती’ या चित्रपटापर्यंत सातत्याने वेगळे चित्रपट देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आता ‘पोस्टकार्ड’ हा अजून वेगळा चित्रपट घेऊन येत आहेत. श्री पंत प्रॉडक्शनच्या विनय गानू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १९६५ ते ७० या दरम्यानच्या काळाचा वेध या चित्रपटातून घेण्यात येतोय. एका पोस्टमनला नोकरी करताना आलेले अनुभव हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे.
घरोघरी पत्र टाकताना लोकांची दु:ख, आनंद याचा अनुभव पोस्टमनलाही येत असतो. त्यातील तीन घटनांचा साक्षीदार ठरलेल्या, त्यात गुंतलेला पोस्टमन, त्या घटनांमधून त्याला मिळालेली जीवनसमृद्धता याचे चित्रण या चित्रपटातून करण्यात येत आहे. लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन करणा-या गजेंद्र अहिरे यांच्या या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, सुबोध भावे, सई ताम्हणकर, राधिका आपटे, किशोर कदम, हेमांगी कवी, वैभव मांगले, सुहिता थत्ते अशी तगडी स्टारकास्ट आहे.
समीक्षकांनी गौरवलेला आणि अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘अनुमती’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्माते प्रशांत गानू यांनी नवा चित्रपट हाती घेतला आहे. त्याविषयी ते म्हणाले, `या चित्रपटाची कथा मला फार आवडली. ती इतकी सुंदर आहे, की या चित्रपटाची निर्मिती आपणच केली पाहिजे असे वाटले. अनुमती अद्याप प्रदर्शित झाला नसला तरी प्रेक्षकांच्या पसंतीची पावती नक्कीच मिळेल याचा विश्वास वाटतो. पोस्टकार्ड हा चित्रपट ऑगस्टच्या दरम्यान प्रदर्शित करण्याचा मानस आहे; असेही गानू म्हणाले.
पोस्टमन आताच्या काळात आठवणींतली गोष्ट झाली आहे. काळ बदलला असला तरी माणसाच्या संवेदना कायम आहेत. या चित्रपटात त्याच संवेदनांचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. एका कथानकातील तीन उपकथानकांमधून मानवी नातेसंबंध उलगडतात असे गजेंद्र अहिरे यांनी सांगितले.
या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी योगेश राजगुरू आणि संगीत गंधार संगोराम करत आहेत. भोर, सांगली, विटा, पुणे आधी ठिकाणी याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. प्रशांत गोखले चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटात काम करण्याच्या फार वेगळा अनुभव गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. `गजेंद्रच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी पूर्वीपासूनच कुतूहल होते. बर्याच काळापासून एकत्र काम करण्याविषयी आम्ही बोलत होतो. आतापर्यंत मी नेहमी चित्रपट स्वत: लिहून त्यात अभिनय केला आहे. या चित्रपटात मी अभिनेता म्हणून समर्पित होऊन दिग्दर्शकाला पाहिजे त्या पद्धतीने सामोरे जाण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटामुळे वेगळ्या माणसाच्या दृष्टिकोनातून काम करण्याची संधी मिळाली.’ असे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता गिरीश कुलकर्णी म्हणाले.