दहशतवादी स्वयंप्रेरित होत आहेत

भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी दहशतवादी तरुणांची भरती करावी लागते. पूर्वी याबाबत असे म्हटले जात होते की, गरिबी आणि बेरोजगारी हे अशा दहशतवादी संघटनांचे भांडवल होते. कमी शिकलेले आणि गरिबीने पिचलेले तरुण अशा संघटनांच्या जाळ्यात सापडतात आणि त्यांना एकदा पाकिस्तानला नेऊन आणले की तो कायमचाच दहशतवादी होऊन जातो. काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना अशा तरुणांना गाठत असत. अजमल कसाब हा असाच गरीब आणि लाचार होता. पण आता आता असे लक्षात यायला लागले आहे की, श्रीमंत घरातले आणि उच्च शिक्षित तरुणही दहशतवादी संघटनांत येत आहेत.

गेल्या पाच सहा वर्षात पकडण्यात आलेल्या दहशतवादी तरुणांवर नजर टाकल्यास ही गोष्ट लक्षात येते. त्यातले काही अभियंते आहेत आणि काही डॉक्टरही आहेत. असे असले तरीही या उच्च शिक्षित तरुणांना काही बाही सांगून आणि डोक्यात धार्मिक कट्टरतेचे विचार घुसवूनच दहशतवादी बनवले जात होते. ब्रेन वॉशिंग करावे लागत असे. त्यांना धार्मिक विचारांनी प्रेरित करावे लागत असे. बाबरी मशीद पाडतानाची दृष्ये दाखवणे, गुजरात दंगलीतल्या मुस्लिमांवर अत्याचार झाल्याच्या कहाण्या ऐकवणे असे प्रकार केले जात होते. तेव्हा ते तरुण चिडून दहशतवादी कारवाया करण्यास प्रवृत्त होत होते. पण आता त्यांच्यात काही बदल झालेला दिसत आहे.

हैदराबाद स्फोटात संशयित म्हणून सहभागी झालेल्या दोन युवकांचे जबाब घेताना त्यांनी जे सांगितले त्यावरून हा बदल लक्षात आला आहे. त्यांना दहशतवादी कारवायांत सहभागी होण्यास कोणीही उद्युक्त केलेले नाही. कोणीही त्यांचे ब्रेनवॉशिंग केलेले नाही असे त्यांनी सांगितले. भारतात दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याच्या संशयावरून अनेक निरपराध मुस्लिम तरुणांना अटक केली जात आहे आणि त्यांचा पोलिसांकडून छळ होत आहे अशा बातम्यांनी आपण चिडलो आहोत आणि आपणहून या संघटनांत सहभागी झालो आहोत असेही त्यांनी कबूल केले.

विशेेष म्हणजे त्यांनी इतरही अनेक तरुण असेच चिडलेले आहेत अशीही माहिती दिली. या लोकांना कोणीही पाकिस्तानात नेलेले नाही. ते या कामासाठी आता पॅलेस्टाईनला स्वत:हून जायला लागले आहेत. मुस्लिमांना आपल्या संरक्षणाचे प्रशिक्षण, प्रेरणा आणि पैसा हा आता त्यांना पॅलेस्तिनी मुक्ती आघाडीकडून मिळत आहे. याच संघटनेने ज्यूंच्या विरोेधात लढा देऊन मुस्लिमांचे संरक्षण केले आहे असा या तरुणांचा दावा आहे.

Leave a Comment