तुळजापूरचे रूप पालटतेय

महाराष्ट्रातली धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे यांची अक्षम्य उपेक्षा केली जाते. त्यांच्या विकासासाठी केन्द्रांकडून निधी मिळाला तर त्यांचा विकास होऊ शकेल असे म्हटले जाते पण तो निधी मिळावा यासाठी कोणी प्रयत्न करीत नाही. आताचे काँग‘ेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग मु‘यमंत्री असताना आणि नंतरही दरसाल आषाढीला पंढरपूरला येत असत. त्यांनीही अनेकदा असा निधी मिळवला पाहिजे असे प्रतिपादन केले पण प्रत्यक्षात काही केले नाही.

रामदास आठवले दहा वर्षेे पंढरपूरचे खासदार होते पण त्यांनाही या कामी यश आले नाही. आता गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या कामात काही तरी केले आहे आणि केन्द्रातल्या पर्यटन खात्याने सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट या तीन तीर्थक्षेत्रासाठी आणि लगतच्या तुळजापूरसाठी पर्यटन विकासाचा एक भाग म्हणून 44 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या चार क्षेत्रांना प्रत्येकी 11 कोटी रुपये मिळणार आहेत. सध्या महाराष्ट्रात शिर्डीचा गवगवा फार होत आहे. तिथे आता दरसाल आठ ते दहा लाख भाविक यायला लागले आहेत पण पंढरपूर आणि तुळजापूरला 15 ते 20 लाख भाविक येत असतात. त्यांची फार चर्चा होत नाही.

पंढरपूरला काही प्रमाणात निधी मिळत होता पण तुळजापूरकडे कोणाचे लक्ष नव्हते. माजी मु‘यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मु‘यमंत्री असताना महाराष्ट्राच्या या कुलस्वामिनीसाठी 320 कोटी रुपयांची योजना आखली असून या पैशातून तुळजापूरचे स्वरूप पार बदलून जात आहे. या कामांशिवाय तुळजापूर देवस्थानने आपल्या निधीतून दर्शन बारीची फार चांगली व्यवस्था केली आहे. 320 कोटी रुपयांतून गावात अनेक कामे सुरू झाली आहेत. भक्तांना निवासाची चांगली सोय करून देण्यासाठी चार भक्त निवास बांधणे सुरू आहे. पूर्ण तुळजापूर शहरातले रस्ते रुंद केले जात आहेत. गावातून भूमिगत गटारी होत आहेत. पापनाश तीर्थाच्या दुरुस्तीचे काम जारी आहे.

तुळजापूरला 22 किलोमीटरवरून पाणी आणले जाते. त्या मार्गावरची जलवाहिनी जुनी झाली होती ती पूर्णपणे नवी टाकली जात आहे. तुळजापूर पासून अन्य गावांना जाणारे रस्ते गावापासून पाच किलोमीटर पर्यंत चौपदरी केले जात आहेत. अशा सर्व सुविधा झाल्याने गावाचे स्वरूप बदलून जात आहे. त्यातच आता केन्द्राच्या पर्यटन खात्याने 11 कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यामुळे पर्यटन महामंडळाच्या आधीच असलेल्या काही सोयी अद्ययावत होणार आहेत.