टीम राजनाथसिंह

भारतीय जनता पार्टीचे नवे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी आपली नवी टीम बराच विचार करून विविध प्रकारचे समतोल साधत जाहीर केली आहे. तिच्यात हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववादाच्या बाबतीत उदासीन असलेले नेते यांचा जसा समतोल आहे तसाच नव्या जुन्याचाही उत्तम मिलाप आहे. कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षाला आपल्या पक्षाची सर्वसमावेशक छबी जनतेच्या मनावर ठसविण्यासाठी अशी कसरत करावीच लागते. काही जुन्या नेत्यांची नावे कार्यकारिणीवर असावी लागतात, जशी अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांची नावे घेण्यात आलेली आहेत. भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी हे केंद्रीय निवडणूक समितीमध्ये आहेत. त्यांच्याबरोबर या समितीत गोपीनाथ मुंडे यांचाही समावेश करण्यात आला आहे. श्याम जाजू आणि पूनम महाजन-राव यांची चिटणीस म्हणून झालेली निवड आणि प्रकाश जावडेकर यांचे पक्षाच्या प्रवक्त्यांमध्ये कायम राहिलेले स्थान हे महाराष्ट्राचे या कार्यकारिणीतले प्रतिनिधीत्व आहे. या कार्यकारिणीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात महिलांना, तरुणांना आणि नव्या रक्ताला संधी देण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीचे चाहते आणि मतदार वारंवार तेच ते चेहरे बघून कंटाळलेले होते. मात्र आता त्या सर्वांना बॅक स्टेजला टाकून नव्या लोकांना वाव दिला आहे. भारतीय जनता पार्टी काँग‘समधल्या घराणेशाहीवर सातत्याने कोरडे ओढत आलेली आहे. परंतु पूनम राव यांना एवढी मोठी बढती देताना घराणेशाहीचा वापर झालेलाच नाही, अशी काही खात्री देता येत नाही. भाजपाच्या चिटणीस मंडळात घराणेशाहीने झालेली एक वेगळ्या प्रकारची नियुक्ती म्हणजे वरूण गांधी. त्यांना पक्षाचे सरचिटणीस करण्यात आले आहे. एवढे मोठे पद प्राप्त करण्यासाठी त्यांनाही घराणे वेगळ्या पद्धतीने उपयोगी पडलेले आहे.

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना सोनिया आणि राहुल गांधी यांना खिजवायचे असल्यामुळे त्यांनी वरूण गांधीला एवढे मोठे केलेले आहे. म्हणजे तिथेही विरुद्ध अर्थाने का होईना घराणेशाहीचा गाजावाजा झालेला आहे. असा गाजावाजा झाला असला तरी पूनम राव आणि वरूण गांधी हे नवे चेहरे पक्षामध्ये चैतन्य निर्माण करणारे आहेत यात काही वाद नाही. या दोघांच्या बरोबरच सरचिटणीस म्हणून अमित शहा यांचीही निवड झाली आहे. ती मात्र वादग‘स्त ठरू पाहणारी आहे. कारण अमित शहा बरेच दिवस तुरुंगात जाऊन आलेले आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री असताना गुजरातमध्ये झालेल्या बनावट चकमकींमध्ये ते आरोपी आहेत. अशा व्यक्तीला पक्षाचा सरचिटणीस करणे ही गोष्ट भाजपाच्या तत्वांच्या आणि नैतिकतेच्या गोष्टींशी विसंगत आहे. मुळात नरेंद्र मोदी यांचे महत्व या कार्यकारिणीत वाढले असल्यामुळे अमित शहा यांचा समावेश झालेला आहे. नरेंद्र मोदी यांचा पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये झालेला समावेश सुद्धा ऐतिहासिक ठरला आहे. कारण आजपर्यंत पार्लमेंटरी बोर्डावर एक मु‘यमंत्री नेमला गेलेला नव्हता. परंतु नरेंद्र मोदी यांना अपवाद करून या पक्षाच्या सर्वोच्च मंडळात घेतले गेले आहे. नरेंद्र मोदी यांंना पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार करणार का, हा प्रश्‍न सध्या वादग‘स्त ठरलेला आहे. त्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची ही निवड चर्चेची झाली आहे.

राज्यसभा सदस्य असलेल्या लहान पडद्यावरील अभिनेत्री स्मृती इराणी यांना पक्षाचा उपाध्यक्ष करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात त्या पक्षाच्या बाजूने खंबीरपणे उभ्या रहात आल्या आहेत आणि त्यांनी भाजपा महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून काम केलेले आहे. त्यांना आता बढती मिळाली आहे. स्मृती इराणी यांनी मात्र पक्षाचा वैचारिक बांधिलकी मानणारा कार्यकर्ता म्हणून स्वत:मध्ये चांगले बदल केले आहेत, त्याचे हे फळ आहे. हेमा मालिनी यांना मात्र ते जमले नाही. त्यामुळे त्यांना आता उपाध्यक्षपदावरून हटवण्यात आलेले आहे.

उपाध्यक्षांच्या यादीमध्ये उमा भारती आणि एस.एस. अहलुवालिया या दोघांची नावे ठळकपणे दिसत आहेत. अहलुवालिया यांनी संसदीय कामामध्ये बरेच योगदान दिलेले आहे. उमा भारती या भाजपाचा हिंदुत्ववादी चेहरा आणि ओबीसी चेहरा म्हणून पुढे आलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदीर्घकाळ कसलेही काम न करता विराजमान असलेल्या काही नेत्यांना राजनाथसिंग यांनी वगळले आहे. त्यामध्ये नजमा हेपतु‘ा आणि शांताकुमार यांचा समावेश आहे. अशा नेत्यांत यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिंन्हा, राम जेठमलानी आणि जसवंतसिंह या नेत्यांचा समावेश होता. पक्षातले जुने चेहरे म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल असे हे नेते आता कार्यकारिणीत नसतील. यातला प्रत्येकजण थोड्या बहुत प्रमाणात का होईना पण पक्षाला वैताग वाटावा असा ठरलेला आहे. पक्षाच्या चिटणीस मंडळामध्ये महाराष्ट्रातून झालेली एक निवड नक्कीच उल्लेखनीय ठरणारी आहे ती म्हणजे श्याम जाजू यांची. ते बर्‍याच वर्षांपासून प्रसिद्धी पासून दूर राहून पक्षाचे कार्यालय प्रमुख म्हणून काम पहात होते. त्यांना चिटणीस करण्यात आल्यामुळे न्याय मिळाला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांना यावेळी संधी मिळालेली नाही.

Leave a Comment