बंगलोर दि.१ – कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणूकात काँग्रेसमधील वरीष्ठ मुस्लीम नेत्यांनी यंदा त्यांना जादा प्रतिनिधित्व दिले जावे यासाठी आत्तापासूचन दबाव आणण्यास सुरवात केली असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकात मुस्लीमांची लोकसंख्या १३ ते १४ टक्के आहे. येथे मुस्लीम अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत व त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचे पारडे ते बदलू शकतात मात्र मुस्लीमांना कमी प्रतिनिधित्व दिले गेले तर चुकीचा संदेश मुस्लीम समाजात जाऊ शकतो असे या नेत्यांचे म्हणणे आहे.
कर्नाटाकातील अल्पसंख्याक व्यवहार मंत्री के रहमान खान, माजी केंद्रीय मंत्री जाफर शरीफ तसेच काँग्रेसच्या धोरणात्मक निवडणूक समितीचे नवनियुक्त सदस्य सी.एम इब्राहिम या नेत्यांनी वरील मागणीसाठी आपले वजन वापरायला सुरवात केली असल्याचे समजते. त्यासंबंधी त्याच्या बैठकाही झाल्या असून यंदाच्या विधानसभेत किमान २८ ठिकाणी मुस्लीम उमेदवार दिले जावेत अशी त्यांची मागणी आहे.२००८च्या निवडणुकात १६ जागा त्यांना देण्यात आल्या होत्या त्यापैकी ८ जागा मुस्लीम उमेदवारांनी जिकल्या होत्या.
कर्नाटकातील अन्य प्रबळ पक्ष असलेले भाजप, जे डी (एस), येडियुरप्पा यांचा केजेपी यांच्यामुळे लिंगायत आणि वोक्कालिंग समाजाची मते विभागली जाणार आहेत मात्र मुस्लीमांची मते काँग्रेस किंवा जेडीलाच जाणार आहेत त्यामुळेच काँग्रेसने मुस्लीमांना जादा प्रतिनिधित्व देऊन मतदारांना योग्य तो संदेश द्यावा अशी विनंती या नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे केली असल्याचे वृत्त आहे.