बेनीप्रसाद गांजेकस, तस्कर – समाजवादी पार्टीचा पलटवार

वाराणसी,दि.31 – काँग्रेसचे नेते आणि केन्द्रीय पोलाद मंत्री बेनीप्रसदा वर्मा आणि मुलायमसिंग यादव यांच्यातल्या आरोप-प्रत्यारोपाने काल गंभीर वळण घेतले. वर्मा यांनी मुलायमसिंग यादव यांच्यावर केलेल्या आरोपांची परतफेड करीत समाजवादी पार्टीने बेनीप्रसाद वर्मा यांच्यावर मादक द्रव्यांची तस्करी करण्याचा आणि स्वत: गांजेकस असल्याचा आरोप केला. या पलटवाराने या दोघांतल्या वादाने आता कटुतेची पातळी गाठली आहे.
सपाचे नेते शिवपाल यादव यांनी काल पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला. ते म्हणाले, बेनीप्रसाद वर्मा खूप धूम्रपान करतात हे सर्वांना माहीतही आहे आणि आपण सर्वांनी त्या संदर्भात बरेच काही वाचलेही आहे पण ते आजकाल सिगारेट ओढताना तिच्या तंबाखूत काही तरी मिसळत असतात. त्यांनी आता वैद्यकीय उपचार करून घेण्याची गरज आहे.
वर्मा हे अफूची तस्करी करतात आणि आपल्या सिगारेटच्या तंबाखूत चरस भरत असतात. या गोष्टीचा त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे असे शिवपाल यादव म्हणाले.
बेनीप्रसाद वर्मा यांनी काल लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवला आणि सपाचे केवळ चार खासदार निवडून येतील असे म्हटले होते. हे चौघे समाजवादी पार्टीची तिरडी उचलतील अशीही मुक्ताफळे त्यांनी उधळली होती. पण त्यांच्या या बडबडीच्या दुसर्‍याच दिवशी शिवपाल यादव यांनी वर्मा यांचा समाचार घेतला.
आज या वादात मुख्यमंत्री अखिलेशसिंग, राम आसरेय कुशवाह आणि रामगोेपाल यादव हे नेते उतरले. अखिलेश सिंग यांनी काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतल्या कामगिरीचा आढावा घेतला. सपा नव्हे तर काँग्रेसलाच चार ते पाच जागांवर समाधान मानावे लागेल कारण विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना पाच ते दहा हजार मते मिळाली आहेत असे ते म्हणाले. रामगोपाल वर्मा यांनी वर्मा यांना केन्द्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली.
राम आसरे कुशवाह यांनीही वर्मा यांची विधाने दुर्दैवी असल्याचे म्हटले. वर्मा यांचा मुलगा सलग दोन वेळा निवडणुकीत पराभूत झाला असल्याने ते निराश झाले आहेत आणि त्यामुळेच असे वैतागून अनुचित बोलत आहेत असे कुशवाह म्हणाले.