दुष्काळातही द्राक्ष निर्यातीत लक्षणीय वाढ

पुणे दि.३० – महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात या वर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती असूनही यंदा गत वर्षीच्या तुलनेत तब्बल ११ हजार टन जादा द्राक्षे द्राक्ष उत्पादकांनी निर्यात केली असल्याचे फळबाग विभागाच्या अधिकार्‍यानी सांगितले. यंदा आत्तापर्यंतच २६,२३४ टन द्राक्षे निर्यात करण्यात आली असून ही निर्यात एप्रिलच्या मध्यापर्यंत सुरू राहणार आहे.

महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर, लातूर, बीड या जिल्ह्यात द्राक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. यंदा यातील बर्‍याच ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र तरीही द्राक्ष उत्पादकांनी प्रसंगी टँकर विकत घेऊन द्राक्ष बागा जगविल्या आणि द्राक्षांचे चांगले उत्पन्न मिळविले असे सांगण्यात येत आहे. अर्थात त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असली तरी निर्यातीसाठी दरही चांगले मिळाले आहेत. आत्तापर्यंत युरोपियन युनियन देशांत द्राक्षे निर्यात झाली असून नेदरलँडस, स्वीडन, यूके, फिनलंड या देशांकडून द्राक्षांची मागणी नोंदविली गेली आहे.

भारतात महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक ही राज्ये द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असली तरी महाराष्ट्रातूनच द्राक्षाची सर्वाधिक निर्यात केली जाते असेही फळबाग विभागातील अधिकार्‍यानी सांगितले.

Leave a Comment