नवी दिल्ली दि.२९ – सर्व जगभरातून सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस फोर स्मार्टफोनची धूम असताना भारतात हा फोन २६ एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भारतात या फोनची किंमत ४२ ते ४५ हजार रूपयांच्या दरम्यान असेल असेही सांगण्यात आले आहे.
या महिन्याच्या सुरवातीलाच न्यूयॉर्क रेडिओ सिटी म्युझिक हॉलमध्ये हा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन सादर करण्यात आला होता. भारतीय ऑनलाईन रिटेल स्टोअर्समध्ये या फोनसाठी ९९९ रूपये भरून ग्राहकाला बुकींग करता येणार आहे असेही समजते. ग्राहक ऑनलाईन पेमेंट करून हे बुकींग करू शकणार आहेत. युकेमध्येही प्री ऑर्डर बुकींग आजपासूनच सुरू झाले असून तेथेही ग्राहकाला फोनची डिलिव्हरी २६ एप्रिलपासूनच देण्यात येणार आहे. सर्व महत्त्वाची नेटवर्क या स्मार्टफोनची विक्री करणार आहेत.
गॅलॅक्सी एस थ्रीपेक्षा नवा गॅलॅक्सी एस फोर आकाराने थोडा लहान असला तरी त्याचा स्क्रीन मोठा आणि अधिक ब्राईट आहे. अँड्रॅईड ऑपरेटिंग सिस्टीमचाच वापर या फोनमध्ये करण्यात आला आहे.