भविष्यात भावभावना असणारे रोबो शक्य

गोवा दि. २९ – माणसात असलेल्या भावभावना या कांही रासायनिक प्रक्रियांमुळेच निर्माण होत असतात. या रासायिनक प्रक्रियांचे कोडे उलगडण्यासाठी संशोधक सातत्याने प्रयत्नशील असून कोणत्याही क्षणी हे कोडे सुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच आज माणसाची अनेक कामे लिलया पार पाडणारे रोबो भविष्यात भावभावनांसहही बनतील असे रेड्डी रोबोटिक्सचे संस्थापक सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी सांगितले. गोव्यात पार पडलेल्या गोवा प्रोजेक्ट २०१३ मध्ये ते बोलत होते.

रेड्डी म्हणाले की आज रोबोटिक्स क्षेत्र अजूनही बाल्यावस्थेत आहे असेच म्हटले पाहिजे. मात्र लवकरच त्यात मोठे शोध लागतील आणि माणसाला करावी लागणारी अनेक कामे हे रोबो पार पडतील. पर्यायाने मानवी जीवन अधिक आरामदायी बनू शकेल. माणसाला ज्या कामाचा कंटाळा असतो, म्हणजे घरातील साफसफाई सारखी कामे हे रोबो पार पाडत आहेतच. पण रोबो हे माणसाला कधीच इजा करणार नाहीत व माणसाला ठार मारणार नाहीत असे जे चित्र रंगवले गेले होते त्यावर मात्र आता विश्वास ठेवणे अवघड आहे.

रोबो शेवटी माणसाचे आदेशच पाळत असतात आणि आज माणसाने त्यांचा वापर सैनिक म्हणून सुरू केला आहे. अमेरिकेची ड्रोन दहशतवाद्यांच्या खातम्यासाठी वापरली जात आहेत. म्हणजेच रोबो माणसांना मारणार नाही अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे असेही ते म्हणाले.

संशोधकांनी माणसाच्या मदतीसाठी अनेक स्वयंचलित उपकरणे तयार केली आहेत. २०२० पर्यंत अशा इंटरनेट रिलेटेड स्वंयचलित उपकरणांची संख्या ५० अब्जांवर जाईल असे सांगून ते म्हणाले की दर माणशी सहा उपकरणे असे त्यांचे प्रमाण होणार आहे.

Leave a Comment