उत्तर कोरियाची रॉकेट हल्ल्याच्या तयारीत

प्यॉगाँग दि.२९- अमेरिकेची स्टील्ट बाँबर विमाने दक्षिण कोरियाकडे झेपावल्यानंतर उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांनी महत्त्वाच्या लष्करी अधिकार्‍यांसोबत आज सकाळी तातडीची बैठक घेतली असल्याचे समजते. या बैठकीत झालेल्या विचार विनिमयानुसार पॅसिफिक आणि दक्षिण कोरियावर हल्ले करण्यासाठी उत्तर कोरियाने त्यांची रॉकेटस सज्ज केली असून तसे आदेश किम जाँग उन यांनी जारी केले आहेत. अमेरिकेचा हिशेब चुकता करण्याची वेळ आता आली आहे असे वक्तव्य किम यांनी केल्यामुळे  वॉशिग्टन आणि प्यॉगाँगमधील तणाव अधिक वाढला आहे.

दरम्यान अमेरिकन प्रशासनाने उत्तर कोरियाने दिलेल्या धमक्या अमेरिकेने गंभीरपणे घेतल्या असल्याचे स्पष्ट करून वेळ कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिका सज्ज असल्याचे म्हटले आहे. संरक्षण सचिव चक हेगेल यांचे अमेरिकेची बॉम्बर दक्षिण कोरियाबरोबर सुरू असलेल्या सरावासाठी उड्डाणे करत आहेत असे  म्हणणे आहे. तसेच दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेवर असल्याने आम्हाला सतत तयार राहायला हवे असेही ते म्हणाले.

उत्तर कोरियाने अमेरिकेबरोबरची हॉटलाईन सेवा यापूर्वीच बंद केली आहे.

Leave a Comment