इस्लामाबाद दि. २८ – पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील क्वेट्टा शहरात राहणारे जम्हुरी वतन पार्टी या पक्षाचे प्रमुख नवाब जादा तलाल अकबर बुगटी यांनी मुशर्रफ यांना मारणार्याला १०० कोटी रुपये बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. या संबंधात ३६ धर्मगुरूंनी संयुक्तपणे एक फतवा जारी केला असून तो लवकरच वेबसाईटवर टाकला जाणार आहे, असे बुगटी यांनी जाहीर केले आहे. मुशर्रफना मारणार्याना १०० कोटी रुपये तर दिले जातीलच, परंतु मुशर्रफ यांची पत्नी सेहबा मुशर्रफ यांनी स्वतः आपल्या पतीची हत्या केली तर सेहबा मुशर्रफ यांना २०० कोटी रुपये बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी चार वर्षांच्या विजनवासानंतर देशात परत येऊन राजकारणात उडी घेतली आहे आणि आपण पाकिस्तानला वळणावर आणू, अशी घोषणा केली आहे. परंतु पाकिस्तानातील राजकीय निरीक्षकांच्या मते मुशर्रफ यांना देशाच्या निवडणुकीत फारसा प्रतिसाद मिळणार नाही, उलट त्यांच्या जीवाला मात्र गंभीर स्वरूपाचा धोका आहे आणि त्यांच्यावर अनेक खटले भरले जाण्याची शक्यता आहे.
मुशर्रफ यांनी अमेरिकेच्या नादी लागून दहशतवादविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून लाहोरच्या लाल मशिदीमध्ये लष्करी कारवाई केली आणि या कारवाईत अनेक निष्पाप लोक मारले गेले. त्यांच्या या धर्मविरोधी कृत्याबद्दल त्यांना मारण्याचा हा फतवा जारी करण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त या लाल मशिदीचे धर्मगुरू मौलाना अब्दुल अजीज यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून मुशर्रफ यांना गंभीर गुन्हे करणार्यांचच्या यादीत म्हणजे एक्झिट कंट्रोल लिस्ट या यादीत समाविष्ट करावे अशी मागणी केली आहे. परवेझ मुशर्रफ यांच्यावर सध्या इतरही अनेक खटले चालू आहेत आणि त्या सर्व खटल्यांमध्ये जामीन मिळून ते परदेशी गेलेले होते. ते सत्तेवर येण्यासाठी म्हणून पुन्हा परत आलेले आहेत.
आपल्या जीवाला धोका आहे त्यामुळे आपल्याला लष्कराचे संरक्षण मिळावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. दहा वर्ष लष्कराचे प्रमुख असलेल्या मुशर्रफ यांना लष्कराचे संरक्षण मिळावे यासाठी अर्ज-विनंत्या कराव्या लागत आहे. तहेरिके तालिबान पाकिस्तान या संघटनेसह इतर अनेक छोट्या-मोठ्या संघटनांनी सुद्धा मुशर्रफ यांच्या विरोधामध्ये हत्येचे फतवे जारी केलेले आहेत. त्यांच्यावरील खटले चालावेत यासाठी सरकार सुद्धा प्रयत्नात आहे असे समजते.