उत्तर प्रदेशात २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जातीय राजकारणाला उधाण आले आहे. गेला आठवडाभर काँग्रेस पक्षावर आडून आडून वार करणार्या मुलायमसिंग यादव यांनी काल काँग्रेसवर थेट हल्ला केला आणि काँग्रेस हा फसवणूक करणारा पक्ष असल्याचे म्हटले. या सार्या राजकारणामागची कारणे काय आहेत, याचा सध्या शोध घेतला जात आहे. केंद्रात मंत्री असलेले उत्तर प्रदेशाचे नेते बेनीप्रसाद वर्मा यांनी मुलायमसिंग यादव यांच्यावर गंभीर आरोप केले.
जातीय राजकारणाला उधाण
मुलायमसिंग हे काँग्रेसचे मित्र असताना आणि त्यांच्याच पाठींब्यामुळे सरकार टिकलेले असताना त्यांच्यावर काँग्रेसचा एक नेता टीका करतो आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्याला आवरत नाहीत, यामागचे राजकारण काय असावे, याचे विश्लेषण केले जात आहे. बेनीप्रसाद वर्मा हे ओबीसी वर्गातील कुर्मी या जातीचे आहेत. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. कारण मध्यंतरीच्या काळात संसदेत अनुसूचित जातींच्या संबंधात एक विधेयक आले होते. त्या विधेयकाच्या निमित्ताने कुर्मी जातीला महत्व आहे. या विधेयकात अनुसूचित जातींच्या सरकारी कर्मचार्याना बढतीमध्ये आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली होती. मायावती यांनी या विधेयकाला पाठींबा दिला, त्यामुळे अनुसूचित जातीचे लोक त्यांच्यामागे उभे राहिले.
उत्तर प्रदेशातील जातीय राजकारणात एस.सी. आणि ओ.बी.सी. या दोन गटांचे हाडवैर आहे. मुलायमसिंग यादव यांनी या विधेयकाला विरोध केल्यामुळे सारा ओबीसी समाज त्यांच्यामागे एकमुखाने उभा राहिला. ओबीसीमध्ये यादवांच्या पाठोपाठ कुर्मी समाजाची संख्या मोठी आहे. त्यांच्यासह सारा ओबीसी समाज आणि मुस्लीम मुलायमसिगांच्या मागे उभे राहिले तर त्यांना लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळू शकते. कारण हे दोन मतदारवर्ग एकत्र आल्यास त्यांची मतांची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षाही जास्त होते.
अशा अवस्थेत मुलायमसिंग यांच्या समाजवादी पार्टीला उत्तर प्रदेशाच्या लोकसभा निवडणुकीत ५० ते ६० जागा मिळू शकतात आणि असे झाल्यास ते सर्वांनाच डोईजड होतील, म्हणून बेनीप्रसाद वर्मा यांना मुलायमसिंगांवर टीका करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. तसे झाल्यास कुर्मी आणि यादव यांच्यात फूट पडेल आणि कुर्मी जातींची मते मुलायमसिगांपासून दूर जातील, असा काँग्रेस नेत्यांचा कयास आहे आणि म्हणूनच बेनीप्रसाद वर्मा हे बेधडकपणे मुलायमसिंग यादव यांच्यावर वाट्टेल तशी टीका करत आहेत आणि काँग्रेस नेते मौन पाळून आहेत.