जपान भारताला देणार २.३२ अब्ज डॉलर्सची मदत

जपानने भारताला पायाभूत क्षेत्रातील सुविधा निर्माण करण्यासाठी २.३२ अब्ज डॉलर्सची मदत देण्याचे मान्य केले आहे. जपान आणि भारत यांच्यात जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी संदर्भात करण्यात आलेल्या द्विपक्षीय करारानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. जपान आणि भारत यांच्यात प्रामुख्याने आर्थिक आणि सुरक्षा विषयक बाबतीत परस्पर सहकार्य केले जाणार आहे असे जपानचे परराष्ट्रमंत्री फुमिओ किशिदा यांनी सांगितले. भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांच्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

जपानचे परराष्ट्रमंत्री किशिदा यांनी यावेळी बोलताना जपान आणि भारतामधील हे संबंध अधिक दृढ व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. खुर्शीद यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत भारताला पायाभूत सुविधांसाठी २.३२ अब्ज डॉलर्स म्हणजे २२० अब्ज येन मदत म्हणून तर ७१ अब्ज येन कर्जस्वरूपात देण्याविषयीची चर्चा झाली होती.

कर्ज स्वरूपात मिळणारी रककम मुंबईतील सबवे प्रकल्पांसाठी वापरली जाणार असून परराष्ट्रमंत्री खुर्शीद यांनी या मदतीचे स्वागत केले आहे. जपानच्या मदतीमुळे भारतातील पायाभूत सुविधा अधिक चांगल्या दर्जाच्या होण्यास मदत मिळणार आहे  असे त्यांनी सांगितले. या कर्ज मदतीतून चार प्रकल्पांचे काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे समजते.

जपान आणि भारत यांच्यात सुरक्षेविषयीच्या सहकार्यासंदर्भातही सहकार्य करार केला जात असून जपानच्या मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्सचे प्रमुख या वर्षाच्या सुरवातीलाच भारत भेटीवर येऊन गेले आहेत. भारताचे संरक्षण मंत्री ए.के. अँटनी या वर्षअखेर जपानला भेट देणार आहेत असेही समजते.

Leave a Comment