सरकार टिकवण्यासाठी….

केंद्रातल्या संपुआघाडी सरकारचा मोठा घटक असलेल्या तृणमूल काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला तेव्हापासून सरकारची अस्थिरता वाढली आहे. आता  द्रविड मुन्नेत्र कळहमनेही  पाठींबा काढून घेतल्याने सरकारला स्थैर्यासाठी सर्वांच्या मिनतवार्‍या कराव्या लागत आहेत. अजून तरी सरकार पडलेले नाही, परंतु अडचणीत नक्कीच आले आहे. मुलायमसिंग यादव आणि मायावती यांनी सरकारला पाठींबा दिल्यामुळे सरकार बचावले खरे पण परंतु या दोन नेत्यांचा पाठींबा कमालीचा बेभरवशाचा असतो. आता सरकार बचावले असले तरी ते पुढच्या काळात कधीही अडचणीत येऊ शकते याची जाणीव संपु आघाडीच्या नेत्यांना झालेली आहे आणि कदाचित मायावती किवा मुलायम यांनी काही दगाफटका केलाच तर आपत्कालीन व्यवस्था म्हणून काय करावे लागेल यावर त्यांनी विचार सुरू केला आहे.

गेल्या दोन दिवसांत संपु आघाडीच्या म्हणजेच काँग्रेसच्या नेत्यांच्या काही बैठका या दृष्टीने झाल्या आहेत आणि राजकारणात काही बदल होण्याचे संकेत मिळायला लागले आहेत. मायावती आणि मुलायमसिंग या दोघांचा पाठींबा बिनभरवशाचा आहे असे मानले जाते. त्याचे प्रत्यंतर आणून देत मुलायमसिगांनी अडवाणींची स्तुती करायला सुरुवात केली आहे. अर्थात त्यामुळे मुलायमसिंग यादव लगेच भाजपाच्या गळ्यात गळा घालतील असा अंदाज करणे चूक आहे, परंतु ते काँग्रेसच्या पाठींब्याबाबत वेगळा विचार करू शकतात हे सूचित नक्कीच झाले आहे.

मुलायमसिंग यादव यांनी पाठींबा काढून घेतला तर सरकार पडू शकते. परंतु सध्या सरकार पडणे कोणालाच परवडणारे नाही आणि विविध पक्षांचे खासदार उगाच मध्यावधी निवडणूक घेण्यास उत्सुक नाहीत.कारण निवडणुकीला खर्चही खूपही येतो आणि आजकाल निवडून येण्याची खात्रीही राहिलेली नाही. खासदारांचा मध्यावधी निवडणुकीला असलेला विरोध संपु आघाडीच्या पथ्यावर पडलेला आहे आणि कितीही पेचप्रसंग आला तरी सरकार पडणार नाही याची खात्री त्यांना झालेली आहे. मात्र तरी सुद्धा सावध राहिले पाहिजे हे त्यांना समजते. कारण बहुमताच्या बाबतीत थोडी जरी अनिश्चितता निर्माण झाली तरी भारतीय जनता पार्टीचे खासदार लोकसभेत सरकारच्या बहुमताचा प्रश्न उपस्थित करतात आणि सरकारची नैतिक कोंडी करण्याचा प्रयत्न करतात.

भारतीय जनता पार्टीच्या गोटातून कळलेली खरी माहिती अशी की, भाजपाचे नेते काहीही बोलत असले तरी त्यांना सुद्धा मध्यावधी निवडणूक नको आहे. अशा प्रकारची एक विचित्र अवस्था केंद्रात निर्माण झाली आहे. कोणाचाच काय नेम सांगता येत नाही, हे या परिस्थितीचे वैशिष्ट्य आहे. मुलायमसिंग यादव यांच्या डोक्यावर काँग्रेसने सीबीआयची कारवाईची तलवार टांगती ठेवलेली आहे. त्यामुळे मुलायमसिंग काँग्रेसच्या विरोधात जाण्याची हिंमत करणार नाहीत, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते खरे; परंतु आपला पाठींबा काढून घेण्याने सरकार नक्की पडणार असेल तर मुलायमसिंग यादव सरकारचा पाठींबा काढून घेण्याची हिमत दाखवू सुद्धा शकतात.

म्हणूनच काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या डोळ्यासमोर दोन पर्याय ठेवले आहेत. पहिला पर्याय आहे नितीशकुमार यांचा. भाजपाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचा निर्णय घेतलाच तर नितीशकुमार नाराज होणार आहेत. त्यामुळे ते संपु आघाडीच्या जाळ्यात सापडतात का, याची चाचपणी संपु आघाडीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. अर्थात ही गोष्ट फार अशक्य आहे. कारण नितीशकुमार हे भाजपावर कितीही नाराज झाले तरी त्यांचे मुख्यमंत्रीपद भाजपाच्या पाठींब्यावरच अवलंबून आहे. तेव्हा भाजपाची साथ सोडणे त्यांच्यासाठी कठीण आहे. पण राजकारणात काहीही होऊ शकते, म्हणून युपीएचे नेते नितीशकुमार यांच्याकडे डोळे लावून बसलेले आहेत.

दुसरा पर्याय आहे ममता बॅनर्जी यांचा. त्यांनी संपु आघाडीचा पाठींबा काढून घेतला असला तरी आता त्यामागचा रागाचा फणकारा उतरला आहे आणि आपण पाठींबा काढून घेऊन नेमके काय कमावले, यावर ममता बॅनर्जी विचार करत आहेत. रागाचा पारा उतरल्यानंतरच्या चिंतनात त्यांना असे आढळू शकते की, पाठींबा काढून घेण्याने आपण काहीच साध्य केलेले नाही आणि म्हणून त्या पुन्हा एकदा संपु आघाडीच्या वळचणीला येऊ शकतात. ममता बॅनर्जी यांनी गेल्या १५ वर्षांपूर्वी भाजपाच्या पाठींब्याच्या बाबतीत असा धरसोडपणा केलेला सुद्धा आहे आणि तशी शक्यता अजूनही असल्यामुळे ममता बॅनर्जींची काँग्रेसच्या नेत्यांना आशा वाटत आहे.

सगळ्यात मोठी नाट्यमय घटना आणि काँग्रेसला पाठींबा मिळणे ही गोष्ट तमिळनाडूत घडू शकते. करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक पक्षाने काँग्रेसचा पाठींबा काढून घेतला आहे खरा; पण या पक्षामध्ये काही सगळे छान चाललेले नाही. करुणानिधी यांचा वारस कोण असावा यावरून पक्षामध्ये मोठे मतभेद आहेत. करुणानिधी यांनी एम.के. स्टॅलिन या आपल्या मुलाला वारस म्हणून जाहीर केलेले आहे. परंतु त्याचा मोठा भाऊ एम.के. अळागिरी हा आपल्या वडिलांच्या या निर्णयावर नाराज आहे. तो काही वेगळा सूर लावत आहे. राजकारण बदलत आहे.