फॅशनेबल मोठी कॉलर वाटावी पण प्रत्यक्षात ते डोक्याचे रक्षण करणारे हेल्मेट असावे ही कल्पना कशी वाटते? विशेषतः दुचाकीस्वारांना तर हेल्मेटचे हे ओझे नेहमीच असून अडचण आणि नसून खोळंबा असे वाटत असते. पण स्वीडनमधील संशोधकांनी मात्र तेथील सायकलस्वारांची या ओझ्यातून सुटका होईल आणि त्यांना थोडीफार फॅशन केल्याचे समाधानही मिळेल असे अफलातून हेल्मेट तयार केले आहे. विशेष म्हणजे हे सायकल चालविताना डोक्यावर वागवावे लागणार नाही तर मानेभोवती कॉलर स्वरूपात ते घालता येणार आहे.
आता प्रश्न असा पडतो की मानेभोवती घालून डोक्याचे रक्षण कसे होणार? या संशोधकांनी ही कॉलर एअरबॅगसह तयार केली आहे. समजा एखाद्या सायकल स्वाराचा अपघात होत असेल तर त्यावेळी त्याच्याकडून ज्या कांही अनिश्चित हालचाली होतील त्यावरून या कॉलरमधील सेन्सर कांही तरी धोका आहे हे जाणतील आणि त्या क्षणी म्हणजे सेकंदापेक्षाही कमी वेळेत ही एअरबॅग सायकल स्वाराच्या डोक्याच्या आकारानुसार डोक्याभोवती संरक्षण कवच तयार करेल.
अल्ट्रा स्ट्रोँग नायलॉन फ्रब्रिकपासून बनलेले हे हेल्मेट अतिशय मजबूत असून ते फुटण्याचा अथवा तुटण्याचा अजिबात धोका नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे. स्वीडन देशात १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना सायकलवरून जाताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असतानाच त्याविरोधात वादाला तोंड फुटले आहे. प्रौढांनाही हेल्मेट बंधनकारक करावे असे मत कांही थरातील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. अ्रशावेळी आलेले हे हेल्मेट तरूणाईबरोबरच प्रौढांनाही वापरावेसे वाटेल असाही संशोधकाचा दावा आहे.