नवी दिल्ली- आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल वीज आणि पाण्याच्या मुद्यावरून चार दिवसापासून दिल्लीत उपोषणाला बसले आहेत. चार दिवसात त्यांच्या वजनात पाच किलोने घट झाली आहे. दरम्यान,गेल्या काही दिवसापासून प्रकृती ढासळत असली, तरी आपला उत्साह कायम असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
उपोषणाला बसलेल्या केजरीवालचे वजन घटले
केजरीवाल यांचे सहकारी मनीष सिसोदिया आणि कुमार विश्वास यांनी सुंदर नगरीत एफ ब्लॉकजवळ उपोषणस्थळाजवळच स्थानिकासोबत पाणी आणि वीज बिलांची होळी केली. सोमवारी भाषण दिल्यानंतर केजरीवाल यांची तब्येत ढासळू लागली होती. त्यामुळे आता ते जास्त बोलू शकत नाहीत.
यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले, ‘माझी तब्येत खालावली आहे, माझे वजन कमी झाले आहे, असे जरी डॉक्टर म्हणत असले तरी माझा उत्साह कायम आहे. आपण सुरू केलेली ही लढाई जिंकल्याशिवाय मी मागे हटणार नाही.’
डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार चार दिवसांच्या उपोषणात केजरीवाल यांचे वजन पाच किलोने कमी झाले आहे. त्यांचा रक्तदाब ११४/७० इतका आहे, नाडीचे ठोके ७५ आणि शुगर ८५ इतकी आहे, असेही या वैद्यकीय अहवालात सांगण्यात आले आहे.