अमेरिकेवर हल्याची उत्तर कोरियाची धमकी

हवाई बेटांसह अमेरिकेची मुख्य भूमी तसेच अमेरिकेच्या अन्य देशांतील लष्करी तळावर हल्ला करण्यासाठी आमची रॉकेटस आणि तोफखाने तयार अ्रसल्याचे उत्तर कोरियाच्या लष्कराच्या सर्वोच्च नेत्यांनी जाहीर केले असून आपल्या लष्कराला कोणत्याही क्षणी हल्ल्यासाठी सिद्ध रहा असा इशाराही दिला असल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेने दक्षिण कोरियाला सर्व ती मदत देण्याचा करार नुकताच केला असून त्याला थेट आव्हान म्हणून उत्तर कोरियाने अमेरिकेवर हल्ला करण्यात येईल असे जाहीर केले आहे. हवाई बेटे, अमेरिकेची मुख्य भूमी, दक्षिण कोरिया तसेच आशिया पॅसिफिक भागातील अमेरिकेचे सर्व लष्करी तळ हे आमचे तोफखाने आणि दीर्घ पल्ल्याच्या रॉकेट्सचे लक्ष्य असतील असे उत्तर कोरियाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी संरक्षण दलांना सिद्धतेचे आदेशही दिले गेले आहेत.

उत्तर कोरियाने डिसेंबर महिन्यातच त्यांच्या रॉकेटची यशस्वी चाचणी केली आहे. दक्षिण कोरिया आणि जपानमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याची क्षमता उत्तर कोरियाच्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात असली तरी हवाई बेटांसह अमेरिकेच्या मुख्य भूमीवर हल्ला करण्यासाठी दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची गरज आहे आणि ती अद्याप पूर्ण विकसित झालेली नाहीत असे मत कांही जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment