ग्रेस यांची कविता अनुभवणे म्हणजेच समजून घेणे – एलकुंचवार

पुणे, दि. 26 (प्रतिनिधी) – कवितेचा अर्थ समजून घेण्यापेक्षा तिचा अनुभव घेणे महत्वाचे असते. कवीवर्य ग्रेस यांची कविता अर्थ लावून समजून घेण्याची नाही तर ती भोगण्यची आहे. सामान्यपणे बुद्धी जिथे संपते तीथे ग्रेस यांची कविता सुरू होते. ग्रेस एक कोड आहे आणि कोडच राहिल असे प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांनी मंगळवारी येथेे सांगितले.

कवी ग्रेस यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त स्वरभारतीच्या वतीने आयोजीत ‘मैत्र जिवाचे कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पं. ह्रदयनाथ मंगेशकर उपस्थित होते. साहित्य, कला क्षेत्रात प्रतिभावंताचा सुकाळ झाल्याचे सांगत एलकुंचवार म्हणाले, ग्रेस यांना अनेकांनी दुर्बुद्ध ठरविण्याचा प्रयत्न केला मात्र ते लोक विसरले की फक्त वाचायला आले म्हणजे कविता समजत नाही त्यासाठी संवेदनशील असावे लागते आणि ग्रेस समजून घ्यायचा तर प्रखर संवेदना आणि तीव्र्र भावना असायला हव्यात त्याशिवाय ग्रेसच्या शब्द्दांपर्यंत पोहचण्याचे संचित आपल्याकडे असायला हवे. समजून घेण्याची नम्रता रसिकांकडे नसली की ग्रेस सारखी प्रतिभावान माणसे दुर्बुद्ध वाटायला लागता आणि गुणाढ्य माणसात प्रतिभावंत दिसायला लागतात.

ग्रेस यांच्या कवितेच्या चार ओळी वाचल्यानंतर त्यांच्या कवितेची भुरळ पडणार नाही अशी व्यक्ती दुर्मिळच असल्याचे सांगताना ते म्हणाले, मी कविता वाचून गहिवरणार्‍यांमध्ये नव्हतो. महाविद्यालयात आम्ही वर्गमित्र होतो त्याचा धाक त्या काळातील ज्येष्ठ कविनांही असल्याचे समजल्याने मी त्याच्या कविता वाचयला घेतल्या आणि एक कविता वाचून त्याच्या गुढ प्रभावाखाली मी गेलो नंतर त्याच्या कवितांना शरणच गेलो. ग्रेसच्या कवितांमध्ये आलेले दुःख अनामी, प्राचीन आणि न डागाळलेले आहे. सामान्य माणसाचे दुःख डागाळलेले असते असे त्यांनी सांगीतले. या नंतर पं. ह्रदयनाथ मंगेशकर, डॉ. सलिल कुलकर्णी आणि राधा मंगेशकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.