मालेगावमध्ये कुत्तागोळीचा हैदोस

tab

उत्तर महाराष्ट्रातल्या जातीय दंगलींसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगाव शहरात कुत्ता नावाच्या एका गोळीने मोठा हैदोस माजवला आहे. काही वेदनाशामके आणि काही बलवर्धक औषधे यांच्या मिश्रणातून काही समाजकंटकांनी ही नवी गोळी शोधून काढली आहे आणि तिच्या सेवनाने हैवान झालेले काही लोक शहरांमध्ये गोंधळ घालत फिरत आहेत. या गोळीला कुत्तागोळी असे नाव दिलेले आहे आणि ती गोळी घेतल्यास माणसाला उत्तेजना प्राप्त होऊन वाट्टेल ते करण्यास प्रेरणा मिळते. त्याच सोबत आणखी काही औषधे तिच्यात मिसळलेली असून त्यांच्यामुळे शरीर बधीर होते. त्यामुळे त्याला कितीही मारले तरी लागत नाही आणि माणूस उत्तेजित झाल्यामुळे गुन्हे करण्याकडे कललेला असतो.

या गोळीची चर्चा मालेगावमध्ये खूप सुरू आहे. काही तज्ज्ञांच्या मते या गोळीलाच डॉग टॅबलेट म्हणण्याची पद्धत आहे. तिच्यामध्ये डायझेपाम हे उत्तेजक आणि मेथॅमफेटॅमाईन हे मिसळलेले आहे. मालेगावच्या भाषेत तिला कुत्तागोळी असे म्हणतात. ही गोळी घेणारा माणूस कोणतेही अधम कृत्य करण्यास प्रवृत्त होतो आणि पिसाळलेल्या कुत्र्यासारखा वागायला लागतो.

मालेगावच्या एका डॉक्टरनी या संबंधात काही माहिती दिली. डायझेपाम या गोळीने झोप येते, परंतु ती झोप टाळून एखादा माणूस जागा राहिला तर त्याच्या भावना खूप भडकतात. त्यात काही वेदनाशामके मिसळली तर गोळ्या खाणारा हर्षवायू झाल्यासारखा आनंदी होतो आणि अतीउत्तेजित होतो. या सगळ्या भावनांच्या भरात त्याला वाईट कृत्य करण्यास भरीस पाडले तर वाट्टेल ते करण्यास उद्युक्त होतो. या गोळीमध्ये एव्हिल ही गोळी मिसळलेली असते. ती २५ पैशाला मिळते, परंतु कुत्तागोळी तयार करणाऱ्याकडून त्याची एवढी मागणी वाढलेली आहे की, त्यामुळे तिची किंमत ११ रुपये झाली आहे.

अशा प्रकारे या गोळ्या खाऊन मस्तीला आलेल्या काही लोकांनी टिळक रोडवर काही महिलांची छेडछाड केली. त्यातल्या एकाला पकडण्यात आले, तेव्हा त्याने कुत्तागोळी घेतल्याचे लक्षात आले. गावातल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही कुत्तागोळी मालेगावमध्ये धार्मिक तेढ वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते, असा इशारा दिला आहे. मालेगावच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही या गोष्टीची दखल घेतली आहे. कारण मालेगाव हे संवेदनशील गाव आहे. गेल्या काही दिवसात तिथे दोन बॉम्बस्फोट झालेले आहेत.

Leave a Comment