परंपरात जखडलेल्या विधवांनी वृंदावनात खेळली होळी

holi

वृंदावन दि.२६ – हजार वर्षे सामाजिक रूढींमुळे अनेक बंधनात जखडल्या गेलेल्या वृंदावनातील विधवाघरातील सुमारे ८०० विधवा महिलांनी यंदा रंगीबेरंगी फुले आणि पाकळ्यांची एकमेकांवर बरसात करत होळी साजरी केली. मात्र या होळीला समाजातून विरोध नव्हता तर उलट नागरिकांनीही सहभाग घेऊन या सामाजिक सुधारणासाठी पुढाकार घेतला असे सामाजिक कार्यकर्ते पारस नाथ चौधरी यांनी सांगितले.

ब्रजमंडळ हेरिटेज कॉन्झर्वेटिव्ह सोसायटी, आग्रा येथून या कार्यक्रमासाठी खास आलेले सोसायटीचे प्रमुख श्रावणकुमार सिंग या संदर्भात बोलताना म्हणाले की ही नेहमीची पारंपारिक होळी नाही तर ती साजरी करण्यामागे कांही खास कारण आहे. वर्षानुवर्षांच्या सामजिक बंधनामुळे अंधार्‍या घरातून आयुष्य जगावे लागणार्‍या विधवा महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न आहे.

सामाजिक कार्यकर्त्या पद्मीनी अय्यर म्हणाल्या की अगदी गेल्या कांही वर्षांपर्यंत अनेक बंधनात जखडल्या गेलेल्या या विधवा महिला सर्व बंधने झुगारून मनसोक्त होळीचा आनंद लुटतील अशी कल्पना करणेही अशक्य होते. मात्र आता या महिलांना समाजात मिसळून त्यांचे आयुष्य जगणे शक्य होते आहे याचा मोठा आनंद आहे. सुलभ इंटरनॅशनल ही संस्था त्यासाठी खास प्रयत्नशील असून त्यांनी या महिलांसाठी वैद्यकीय मदत, कामाचे प्रशिक्षण सुरू केले असून नोंदणी केलेल्या प्रत्येक विधवा महिलेला दरमहा दोन हजार रूपये वेतन दिले जात आहे.

सर्वच्च न्यायालयाने या संदर्भात कांही दिवसांपूर्वी सूचना करून विधवा घरांतून राहणार्‍या या महिलांच्या आयुष्यात आणि मनोधारणेत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यानुसार आयोजित करण्यात आलेल्या होळीची सुरवात रविवारी झाली असून हा कार्यक्रम चार दिवस चालणार आहे. यात या महिला बाहेरच्या नागरिकांबरोबर तसेच परदेशी नागरिकांबरोबर मेजवानीतही सहभागी होणार आहेत असे सांगण्यात आले.

Leave a Comment