पुणे, दि. 25 (प्रतिनिधी) – प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांचे सामाजिक क्षेत्रात कसलेही योगदान नसताना त्यांना पुण्यभूषण पुरस्कार कशासाठी, अशा स्वरुपाचा वाद सध्या पुण्यात उभा राहिला आहे. पण या संदर्भात डॉ देसाई म्हणाले की, योग्य व्यक्ती कोण हे दृष्टीनुसार ठरते. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील योदगान असा कोणताही निकष आम्ही पुरस्कार देतांना लावत नाही, पुण्यातील व्यक्तीचे कर्तृत्व या निकषावर हा पुरस्कार दिला जातो. गाडगीळ यांनी निवेदक म्हणून पुण्याचे नाव जगभरात पोहचवले आहे.
सुधीर गाडगिळांना पुण्यभूषण कशासाठी : अनेकांच्या भुवया उंचावल्या
पुण्यभूषण माऊंडेशनच्या वतीने देण्यात येणार्या पुण्यभूषण पुरस्काराचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. एक लाख रूपये रोख आणि सोन्याच्या फळाने बालशिवाजी पुण्याची भूमी नांगरत असल्याचे स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेली 24 वर्ष हा पुरस्कार सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच संशोधन, उद्योग या क्षेत्रात भरीव कार्य करणार्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे. यामध्ये स्वरभास्कर पंडीत भीमसेन जोशी, राजा दिनकर केळकर संग्राहलयाचे काका केळकर, पुण्याच्या उद्योग क्षेत्राला दिशा देणारे शंतनुराव किर्लोस्कर, पु.ल. देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. जयंत नारळीकर, चंदु बोर्डे, राहुल बजाज, डॉ. श्रीराम लागू आदींचा समावेश आहे.
यावर्षी पुरस्कारासाठी पुण्यभूषण माऊंडेशनचचे माजी विश्वस्त, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ याची निवड करण्यात आली आहे. गाडगीळ यांचे निवेदक म्हणून असलेले कर्तृत्व मान्य केले तरीही उपरोक्त व्यक्तींच्या यादीमध्ये गाडगीळां सारख्या निवेदकांना मोठे करायचे, की या व्यक्तींना निवेदकांच्या रांगेत बसवायचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुणेकरांच्या वतीने दिल्या जाणार्या पुरस्काराबाबत पुणेकरांनी प्रश्न उपस्थितच करायचे नाहीत का?, अशीही विचारणा होत आहे.
———————–
