दोषी आमदारांना अटक करा-राज ठाकरे

अमरावती – स्वत:च्या आमदारांना पाठिशी घालून विरोधी आमदारांवर गुन्हा दाखल करणा-याऐवजी राज्य सरकारने हल्ला करणा-यां सर्वच पक्षाच्या आमदारांना कठोर शिक्षा करावीच , असे रोखठोक प्रतिपादन राज ठाकरे यांनी अमरावती येथील सभेत केले. विधिमंडळात आमदारांनी केलेल्या हल्ल्याचा राज यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

राज ठाकरे १५ दिवसांच्या विदर्भ दौ-यावर आहेत. या दौ-यातील जाहीर सभा अमरावतीच्या सायंस्कोर मैदानावर झाली. यासभेला नागरिकांनी विक्रमी गर्दी केली होती. राज यांनी या सभेत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले. पोलिसांवर आमदारांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. हल्ला करणा-यांना सरकारने कठोर शिक्षा करावीच , असे ते ठामपणे म्हणाले.हल्लाप्रकरणी पाच आमदार निलंबित करण्यात आलेत. परंतु गुन्हा विरोधी पक्षातील आमदारांविरुद्धच का ? असा प्रश्न त्यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर बहिष्कार घालण्याची धमकी दिल्याने देताच सरकारने त्यांच्यापुढे नांग्या टाकल्या. हल्ला करना-या सर्व आमदारांना अटक झाली पाहिजे. पोलिसांवर हल्ला करणा-या आमदारांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. ते सरकारने जाहीर करावे , अशी मागणी राज यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना राज म्हणाले, ‘पश्चिम विदर्भातून तब्बल १ हजार ३७९ मुली बेपत्ता झाल्या. यापैकी ४९५ मुली व महिला अद्यापही बेपत्ताच आहेत. त्या जिवंत आहेत की त्यांचे काही बरे वाईट झाले , याचे ठाम उत्तर सरकारजवळही नाही.’

Leave a Comment