चेन्नई – श्रीलंकेत तमीळ नागरिकांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर द्रमुकने (डीएमके) केंद्रातील आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर, सोमवारी सकाळी झालेल्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीला पक्षप्रमुख एम. करुणानिधी यांचा मुलगा अलगिरी याने येण्याचे टाळले. गेल्या काही दिवसापासून करुणानिधी यांचा मोठा मुलगा अलगिरी व लहान मुलगा स्टॅलिन यांच्यातील संबध ठीक नाहीत. त्यामुळे दोन भावातील वादामुळे डीएमकेमध्ये फुट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डीएमकेमध्ये फुट पडण्याची शक्यता
सोमवारी सकाळी होणा-या पक्षाच्या बैठकीला येण्याचे टाळत मदुराई या लोकसभा मतदार संघात अलगिरी रवाना झाले. आघडीतून बाहेर पडल्यानंतर अलगिरी यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. द्रमुकमध्ये अलगिरी आणि त्यांचा भाऊ स्टॅलिन यांच्यामधील वाद नवीन नाही. करुणानिधी यांनी स्टॅलिन यांना आपला राजकीय वारसदार घोषित केल्यापासून या दोन भावात वितुष्ट निर्माण झाले आहे.
द्रमुकच्या कार्यकारी समितीची सोमवारी महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र पार्टीचे सर्व सूत्रे स्टॅलिन यांच्याकडे सोपविण्यास माजी केंद्रीय मंत्री अलगिरी व त्याच्या पक्षातील समर्थकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही भावातील मतभेद वाढत जाणार असल्याने द्रमुकमध्ये उभी फुट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.