
पुणे, दि. 23 (प्रतिनिधी) – न्यायालय सर्वोच्च असल्याने अभिनेता संजय दत्त यांना दिलेली शिक्षा भोगावी, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, सी.बी.आयवर सरकारचा अंकुश आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष सी.बी.आय. चा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करून घेत असतात. यासाठी सी.बी.आय. वरील असलेला शासनाचा अंकुश काढला पाहिजे. सी.बी.आय.वर लोकपालचा अंकुश असला पाहिजे. जेणेकरून सीबीआयचा वापर सत्ताधारी पक्ष स्वार्थासाठी करणार नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचारही थांबेल. 65 वर्षात झाली नाही तेवढी प्रगती आयपीएस आणि आयएएस अधिकारी 10 वर्षात करू शकतात. मात्र, त्यासाठी अधिकार्यांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. अन कोणतीही राजकीय बंधने नसली पाहिजेत.
प्रादेशिक पक्षा देशासाठी घातक
द्रमुकने केंद्र सरकारचा पाठींबा नुकताच काढला आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अण्णा हजारे म्हणाले, प्रादेशिक पक्ष देशासाठी घातक बनत चालले आहेत. प्रादेशिक पक्ष आलटून-पालटून सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देतात.
पी.चिदंबरम यांनी न्यायालयीन चौकशीस सामोरे जावे
टु जी स्पेक्ट्रम प्रकरणात आपण दोषी नसल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम करत आहेत. मग ते न्यायालयीन चौकशीस का सामोरे जात नाहीत. पी.चिदंबरम दोषी नसतील तर त्यांनी न्यायालयीन चौकशीस जावे. जेणेकरून जे सत्य असेल ते बाहेर येईल.
पाण्याचा अपव्यय टाळावा
नागरिकांनी दुष्काळाची जाणीव ठेऊन सण-उत्सव साजरे करावेत. होळीमध्ये लाकडाचा ढीग जाळू नये. तसेच पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. पाण्याचा वापर जपून प्रत्येकाने जपून केला पाहिजे, असे आवाहनही अण्णा हजरे यांनी नागरिकांना केले.
लोकपालसाठी राष्ट्रपती निवडणूकीप्रमाणे धाडस दाखवावे
राष्ट्रपती निवडणूकीत प्रादेशिक पक्षांनी पाठींबा दिलेला नसतानाही केंद्र सरकारने प्रणव मुखर्जी यांचे नाव जाहीर केले होते. यानंतर थोड्या वेळातच अनेक प्रादेशिक पक्षांनी मुखर्जी यांना पाठींबा दिला. यानंतर झालेल्या निवडणूकीत प्रणव मुखर्जी विजयी झाले होते. हेच धाडस केंद्र सरकारने लोकपालसाठी दाखवावे, असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले.
