गणपती पुळे – प्राचीन स्वयंभू गणपतीचे स्थान

ganapatipule

कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण असलेले गणपतीपुळे हे छोटेसे सुंदर गांव महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सुंदर समुद्र, चंदेरी वाळूचा लांबच लांब किनारा, नारळी पोफळीची बने आणि सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ४०० वर्षांचे जुने स्वयंभू गणेश मंदिर ही या गावाची काही वैशिष्ठ्ये सांगता येतील. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या या छोट्याशा गावी मुंबई, पुणे , कोल्हापूर येथून जाण्यासाठी चांगल्या सोयी आहेत.
Ganpatipule
समुद्राची शांत गाज, मंद मंद वारा, डोंगर उशाशी घेऊन बसलेले गणेश मंदिर, चाहोबाजूने हिरवाई असलेले हे गांव खास कोकणी खेडे आहे. पर्यटकांच्या वर्दळीमुळे आता अनेक हॉटेल्स, दुकाने झाली असली तरी त्याचे मुळचे कोकणी सौदर्य अजून तरी कमी झालेले नाही. अरूंद रस्ते, लाल माती, वैशिष्ठ्यपूर्ण कौलारू घरे, स्वच्छ परिसर, नारळी, पोफळी, कोकम, केळी, आंबे, फणस, जायफळे अशी विविध वृक्षसंपदा अंगावर लेवून गणपतीपुळे सजलेले आहे.
Ganpatipule2
भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ४०० वर्ष जुने गणपती मंदिर प्रथम पाहायला हवे. स्वयंभू म्हणजे आपोआप गणपतीचा आकार घेतलेली येथील मूर्ती अशा प्रकारची एकमेव मूर्ती आहे. गणपती म्हणजे गणांचा, लष्कराचा देव आणि पुळे म्हणजे वाळूचा किनारा यावरून या गावाला हे नांव पडले आहे. टेकडीच्या पायथ्याशी हे मंदिर असून मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. पश्चिम घाटाचा रक्षणकर्ता म्हणून ही मूर्ती पश्चिमाभिमुख असल्याचे सांगितले जाते. या गणपतीला प्रदक्षिणा घालायची म्हणजे या संपूर्ण डोंगराचीच प्रदक्षिणा करावी लागते आणि भाविक ती मोठ्या श्रद्धेने घालतातही.
Ganpatipule1
कोकणात असल्याने येथे हवा उष्ण  आहे तसाच पाऊसही खूप असतो. त्यामुळे येथे जाण्यासाही हिवाळा चांगला असतो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सुंदर रेस्टहाऊस येथे आहे तसेच अन्यही हॉटेल्स बरीच आहेत. कांही घरातूनही राहण्या जेवण्याची सोय होऊ शकते. मोदक, बिरड्याची उसळ, पोपटी, अमसुलाचे सार असा खास कोकणी मेनू एकदा तरी चाखायला हवाच. जेवणाची ऑर्डर देऊन गणपती दर्शन, समुद्रात खेळून येईपर्यंत जेवण तयार मिळते. सकाळी ब्रेकफास्टसाठीही खास कोळाचे पोहे, दडपे पोहे असा कोकणी मेनू सांगावा. मग काय जीवात्मा अगदी तृप्त होऊन जातो.

कोकणात खरेदीला कांही फारसा वाव नसतो. पण फणसाचे गरे, आंबा पोळी, काजू, जायफळे, वाल, पोहा पापड, मिरगुंडे ,अमसुले अशी खादडीची खरेदी मात्र मनसोक्त करता येते. तेव्हा ती करावी. खरेदी आटोपली की सायंकाळी समुद्रावर जाऊन शांतपणे सूर्यास्त पहावा. सार्या  चिंता, मनात साठलेली कोळीष्टके मावळत्या सूर्याच्या साक्षीने समुद्रला अर्पण करावी आणि नव्या उमेदीने, नव्या आकांक्षांनी पुन्हा आपल्या कामाला जुंपून घ्यावे. यासाठी अशा एकदोन दिवसांत करता येणार्याआ सहली फार उपयुक्त ठरतात. पहा तर करून !

Leave a Comment