जपानच्या बौद्धमंदिरातून भरताहेत वधूवर मेळावे

marriage

ओकायामा दि.२३ – गेल्या काही वर्षात जपानमधील बौद्ध मंदिरे इच्छुक वधूवरांसाठी आकर्षणाची ठिकाणे बनत असून येथे इच्छुक वधुवरांसाठी मेळावे भरविले जात आहेत. विशेष म्हणजे या प्रकारे आत्तापर्यंत अनेक विवाह जुळले असून त्यात प्रामुख्याने ३० च्या पुढचे आणि चाळिशीच्या आतील वधूवर अधिक संख्येने आहेत. या मेळाव्यांसाठी २५०० येन शुल्क आकारले जाते मात्र जोडीदार नाही मिळाला तरी निदान एकमेकांची ओळख तरी होते या उद्देशानेही येथे पैसे भरून येणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत चालली असल्याचे सांगण्यात येत आहे.

येथील अनराकुजी बौद्ध मंदिराचे प्रमुख पुजारी योशिनो यासंदर्भात म्हणाले की येथे येणाऱ्या इच्छुक वधूवरांसाठी आम्ही चांगला जोडीदार मिळावा असा प्रयत्न करतो. यात प्रत्येक वराने आपली ओळख टेबलपाशी उभ्या असलेल्या मुलीला तीन मिनिटांत करून द्यायची असते. त्यात स्वतःविषयीच्या माहितीसोबतच व्यवसाय, कुटुंब, आवडीनिवडी सांगायच्या असतात. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम होतो. नंतर उपवर मुलींना ज्या मुलांमध्ये औत्सुक्य वाटेल तिने त्याचे नांव लिहून योशिनो यांच्याकडे द्यायचे असते. त्यानंतर हे लग्न ठरविले जाते. पुजारीच बौद्ध सूत्रे म्हणून चांगल्या जोड्या जुळाव्यात अशी प्रार्थना करतात.

योशिनो म्हणाले की आम्ही उपवर वधूवरांना सांगतो की तुमच्यात बुद्ध आहेच, तुम्ही तो दुसर्यांामध्येही शोधा. त्यामुळेच या उपक्रमाचे नांवही बुद्ध मिट्स बुद्ध असेही ठेवले आहे. योशिनो आणि दोराकुजी मंदिराचे प्रमुख यासुके हे दोघे २०११ पासून असा उपक्रम राबवित असून या दोघांची ओळख एका स्वयंसेवी संस्थेमुळे झाली होती. कुटुंबव्यवस्थेचे घसरत चाललेले महत्त्व कायम राहावे यासाठी हा उपक्रम राबविला जात असून आत्तापर्यंत असे सात मेळावे भरविले गेले आहेत असेही ते म्हणाले.

Leave a Comment