काळवीट शिकार :सैफ, सोनाली, तब्बूवर आरोप निश्चित

जोधपूर – ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शुटींगवेळी कांकणी भागात काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर शनिवारी जोधपूरच्या न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे सलमान खानवरील आरोप अद्याप निश्चित झालेले नाहीत. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २७ एप्रिल रोजी होणार आहे. आरोपी असलेले अभिनेते दोषी ठरल्यास त्यांना तीन ते सहा वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत उपचार घेत असल्यामुळे सलमान न्यायालयात गैरहजर राहिल्याचे समजते.

एक ऑक्टोबर १९९८ रोजी हम साथ साथ है या सिनेमाचे शूटिंग सुरू असताना सलमान, सैफ, सोनाली, तब्बू आणि नीलम यांनी कांकणी परिसरात कायद्याने बंदी असूनही दोन काळवीटांची शिकार केली. त्यानंतर शिकार प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी या अभिनेत्यांनी प्रयत्न केले होते. सलमानवर दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा कलम ९ / ५१ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. मात्र वैद्यकीय कारण देऊन सलमान गैरहजर राहिल्यामुळे त्याच्यावर आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया अपूर्ण आहे.

सैफ, सोनाली, तब्बू आणि नीलमवर वन्यजीव संरक्षण कायदा कलम ९ / ५२ आणि भारतीय दंडविधान कलम १४९ अंतर्गत आरोप ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकरणी आरोपी असलेले सिनेस्टार दोषी ठरल्यास त्यांना तीन ते सहा वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत उपचार घेत असल्यामुळे सलमान न्यायालयात गैरहजर राहिल्याचे समजते.

Leave a Comment