मुंबईतल्या बाँबस्फोटात (म्हणजे 1993 साली झालेल्या स्फोटात) 257 लोक मेले आणि सातशेपेक्षाही अधिक लोक जखमी झाले. देशाची इभ्रत तर गेलीच पण चार हजार कोटी रुपयांंचे नुकसान झाले. या स्फोटाने झालेली हानी भरून न येणारी आहे पण तिची काहीच क्षिती नसणारे काही बिनडोक लोक आपल्या देशात आहेत. त्या 257 जणांच्या कुटुंबांचे काय झाले आणि सातशेवर लोकांच्या कुटुंबांचे काय हाल झाले याच्या वेदनेपेक्षा त्यांना संजुबाबाच्या कारावासाची अधिक चिंता लागून राहिली आहे. खरे तर या कटातल्या सूत्रधारांशी त्याची एवढी जवळीक होती की तो खरा दहशतवादीच आहे पण त्याच्या वडिलांनी भरपूर पैसा ओतून त्याच्या बाजूने वकिलांची फौज उभी केल्यामुळे त्याची दहशतवादी या शिक्क्यातून सुटका झाली पण त्याला झालेली सहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा योग्यच होती. कायद्यातल्या काही कलमांखाली सर्वोच्च न्यायालयाने ती आणखी एका वर्षाने कमी झाली. या पूर्वी त्याने दीड वर्षे सजा भोगलेली असल्यामुळे आता त्याच्यावर साडे तीन वर्षे कारावास भोगण्याची पाळी आली पण या शिक्षेने मार्कंडेय काटजू आणि तत्सम अनेक लोकांना अधिक दु:ख झाले आहे.
कायदा सर्वांना सारखा
यातले बरेच लोक संजय दत्तला संजु बाबा अशा लाडक्या नावाने संबोधत असतात. खरे तर अशा दहशतवादी प्रवृत्तीच्या नटाला असे लाडक्या नावाने संबोधने हेच या लोकांच्या विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे. आता तर या लोकांनी संजुबाबाची शिक्षा माफ करा म्हणून टाहो फोडला आहे. या लोकांचे कायद्याचे ज्ञान, युक्तिवाद करण्याची रीत पाहिली म्हणजे आपल्या देशात देशभक्ती नावाची काही चीज शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडतो. त्याला पश्चात्ताप झाला आहे, तो मोठा कलाकार आहे, त्याला दोन मुले आहेत, त्याचे वडील देशभक्त होते (म्हणजे काय होते ?), तो अजाणतेपणाने यात ओेढला गेला असे अनेक बहाणे सांगून त्याची तरफदारी करण्याची चढाओढ या देशात लागली आहे. या देशाचे यापरते दुर्दैव काय असेल ? संजय दत्त सोबत अनेकांना शिक्षा झाल्या आहेत. त्यातले सर्वजण अजाणतेपणानेच या कटात सहभागी झाले होते आणि त्या सर्वांचे वडील काही देशद्रोही नव्हते. त्यांचेही वडील देशाविषयी प्रेम बाळगणारेच होते. त्यातले अनेक लोक विवाहित आहेत म्हणजे त्यातल्या अनेकांना दोनच काय पण तीन तीनही मुले असतील. उलट संजय दत्तच्या मुलांचे तो जेलमध्ये गेल्यास हाल होणार नाहीत.
बाकीच्या लोकांच्या मुलांचे हाल होणार आहेत कारण त्यांच्या बँकेत संजय दत्त प्रमाणे करोडो रुपये ठेवलेले नाहीत. मग दोन मुले आहेत म्हणून संजय दत्तवर मेहरबानी करायची असेल तर त्या मेहरबानीस या कटातले अन्य आरोपीच अधिक पात्र ठरतात. पण त्यांच्या वतिने कोणीही एवढा आक्रोश करीत नाही. अर्थात तसा तो करताही कामा नये पण त्यांच्या बाबतीतही करता कामा नये आणि संजय दत्तच्या बाबतीतही करता कामा नये. संजय दत्त हा मोठा कलाकार आहे म्हणून त्याला माफी द्यावी असे कोणी म्हणत असेल तर तो कायद्याचा अधिक्षेप ठरेेल कारण देशातला कायदा सर्वांना सारखा आहे. कलाकारांसाठी कायद्यात काही वेगळ्या तरतुदी नाहीत. या खटल्यातले अन्य आरोपी आणि संंजय दत्त यांच्यात आरोपी म्हणून काहीही फरक नाही आणि करताही कामा नये. केवळ कटातला सहभाग, त्या सहभागामागची भावना आणि त्याच्या कृत्याचा परिणाम यांच्या तीव्रतेनुसार त्यांच्या शिक्षांत काय तो कमी जास्त पणा होईल पण केवळ कलाकार आहे म्हणून कोणी दया दाखवण्याची मागणी करीत असेल तर त्याला कायदा नीट माहिती नाही असेच म्हणावे लागेल. मग तो न्यायमूर्ती काटजू का असेनात. कायद्यासमोर सगळे सारखे हे कायद्याचे सर्वात मुख्य तत्त्व असते हे विसरता कामा नये.
संजय दत्तची शिक्षा राज्यपाल कमी करू शकतात असे काटजू यांचे म्हणणे आहे. आजवर राज्यपाल आणि राष्ट्रपती मृत्यूदंडाच्या शिक्षेत दया दाखवू शकतात असे माहीत होते. काटजूंनीही कोणाची कारावासाची शिक्षा अशी राज्यपालांनी कमी केल्याचे असे उदाहरण सांगितलेले नाही. काही वेड्या लोकांनी मागणी लावून धरली आणि जनमताचा रेटा निर्माण झाला म्हणून कोणा राज्यपालांनी त्याला खरोखरच माफी दिली तर आपण न्यायालयात त्याला विरोध करू असा इशारा वन मॅन आमीं सुब्रमण्यम स्वामी यांनी देऊन ठेवलाच आहे. पण आपल्या देशातल्या लोकांना कलाकारा विषयी असा उमाळा का येतो ? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. कलाकार हा गुणांनी सामान्य माणसा प्रमाणेच असतो पण काही कलाकार चित्रपटात चांगल्या माणसाची भूमिका करतात. लोक त्या भूमिकेवरून त्याला चांगलाच समजायला लागतात. एन. टी. रामाराव, एम. जी. रामचंद्रन यांनी आपल्या भूमिकांतूनच मते मिळवली. लोक पडद्यावरची भूमिका आणि वास्तव आयुष्य यात फरक क रत नाहीत. तसाच प्रकार आता होत आहेत. संजय दत्तने ‘लगे रहो मुन्नाभाई’ मध्ये जे काम केले आहे तसाच तो प्रत्यक्षात आहे असे लोक मानायला लागले आहेत. पण तो त्याचा अभिनय होता हे लोकांना समजेनासे झाले आहे. म्हणूनच त्याला माफी देणारे लोक मूढ आहेत असे म्हणावे लागते.