संजय दत्तचा मुक्काम येरवडा तुरूंगात?

पुणे दि.२३ – मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कालच सुनावली आहे. त्यापैकी अठरा महिने तुरूंगवास भोगून झालेला असल्याने आता संजयला साडेतीन वर्षे तुरूंगात राहावे लागणार आहे. त्याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहातच होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

याविषयी माहिती देताना जेल अधिकारी म्हणाले की संजय दत्तला मुंबई अथवा मुंबई जवळच्या कुठल्याही तुरूंगात ठेवले तर तेथे त्याला भेटायला येणार्याई त्याच्या फॅन्समुळे तुरूंगाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठा ताण येतो. येरवडा कारागृहात गरज पडल्यास जादा सुरक्षा पुरविणे तुलनेने सोपे जाते. कारण पुण्यात शहर पोलिस आणि राज्य राखीव दलाचा जादा स्टाफ उपलब्ध होऊ शकतो.

ठाणे येथील तुरूंगात आत्ताच क्षमतेपेक्षा जादा कैदी आहेत. तळोजा जेलमध्ये गँगस्टर अरूण गवळीला ठेवले गेले आहे तर त्याचे अन्य साथीदार औरंगाबाद व कोल्हापूर तुरूंगात आहेत. नागपूर तुरूंगात सुविधांचा अभाव आहे. परिणामी संजय दत्तला पुण्यालाच हलविले जाईल असा अंदाज आहे. येरवडा तुरूंग आणि येथील कर्मचारी संजय दत्तला नवीन नाहीत कारण २००७ मध्ये १८ महिन्यांचा काळ त्याने येथेच काढला आहे. त्याच्या अनेक कडू गोड आठवणी येथील कर्मचारी आजही सांगतात असेही हे अधिकारी म्हणाले.

Leave a Comment