कार उत्पादकांकडून भरघोस सवलतींचा वर्षाव

मुंबई दि. २२ – कार विक्रीत होत असलेल्या घटीची नेांद घेऊन कार उत्पादक कंपन्या तसेच वितरकांकडून ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी विविध सवलती आणि किमतीत सूट अशी आमिषे दाखविली जात आहेत. गेल्या महिन्यात १२ वर्षातील नीचांकी विक्री नोंद नोंदली गेली असून कार विक्रीतील ही घट तब्बल २६ टक्के असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अर्थात आक्टोबर २०१२ मध्येही असेच मोठे डिस्काऊंट कार उत्पादकांनी जाहीर केले होते त्यापेक्षा आत्ताचे डिस्काऊंट कमी असल्याचेही दिसून येत आहे.

ज्या गाड्यांना काही महिन्यांपूर्वी चांगली मागणी होती आणि त्यासाठी प्रतीक्षायादीही होती, त्या गाड्यांवरही आता डिस्काऊंट जाहीर केले गेले असून त्याचे प्रमाण २२ हजार रूपयांपासून ५० हजार रूपयांपर्यंत आहे. त्यातही डिझेल मॉडेलवर जादा डिस्काऊंट दिले जात आहेत. डिझेलची टॉप सेलिंग शेवरोलेटची बीट, ह्युंडाईची आय २०, महिंद्राची एक्सयूव्ही ५००, मारूतीची एर्टिगा या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांच्या किमतीवर साडेसात टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

गेल्या कांही दिवसांत डिझेलची झालेली दरवाढ आणि तुलनेने स्थिर राहिलेले कर्जासाठीचे व्याजदर यामुळे ग्राहकांनी कार खरेदीला थोडा विराम दिल्याचे बाजारात दिसून येत आहे. पेट्रोल गाड्याना तुलनेने बरी मागणी आहे. मात्र डिझेल गाड्यांना मागणी कमी होत आहे. याची नोंद घेऊन मारूतीने नवीन अल्टोवर साडेसात टक्के सूट दिली आहे तर टाटा इंडिगो डिझेलवर ५० हजार रूपये सूट दिली जात आहे. शेव्हरोलेट बीटवर ४४ हजार सूट आहे. सध्या बाजारात पेट्रोल आणि डिझेल गाड्यांची विक्री प्रमाण ५० – ५० असेच दिसून येत आहे.

रेनॉल्टच्या डस्टरला मात्र अजूनही चांगली मागणी असून त्यांनी गाडीच्या किमतीत कोणतीही सूट दिलेली नाही असे समजते.

Leave a Comment