संजय दत्त पाच वर्षांसाठी तुरूंगात

मुंबई दि.२१ – बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला सुप्रीम कोर्टाने मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवून पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावली असून चार आठवड्यात त्याला पोलिसांच्या स्वाधीन व्हावे लागणार आहे. संजयने यापूर्वी १८ महिन्यांचा तुरूंगवास भोगला असल्याने आता त्याला आणखी साडेतीन वर्षे तुरूंगात काढावी लागणार आहेत. टाडा न्यायालयाने सुनावलेली सहा वर्षांची शिक्षा सुप्रीम कोर्टाने १ वर्षाने कमी केली आहे.

१९९३ साली मुंबईत बाबरी मशीद पाडल्याचा बदला म्हणून करण्यात आलेल्या १२ साखळी बॉम्बस्फोटात यापूर्वीच टाडा न्यायालयाने संजय दत्त याला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सहा वर्षांचा तुरूंगवास अशी शिक्षा जुलै २००७ रोजी सुनावली होती. मात्र अन्य आरोपातून त्याला मुक्त केले होते. संजयकडे एके ५६ सह आणखी दोन स्वयंचलित बंदुका आणि रिव्हॉल्वर ही विनापरवाना शस्त्रे सापडली होती. ही शस्त्रे मुंबई बाँबस्फोट खटल्यातील दोषी आरोपींकडून त्याला मिळाली होती.

या बॉम्बस्फोट प्रकरणी सुप्रीम कोर्टाने गँगस्टर दाऊद इब्राहिम याला कट रचणे याबद्दल तर टायगर मेनन व याकूब मेनम यांना स्फोटात सहभाग असल्याबद्दल दोषी ठरविले आहे. तसेच या कटासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयलाही दोषी ठरविले गेले आहे. याकूबला टाटा न्यायालयाने सुनावलेली फाशी सुप्रीम कोर्टाने कायम केली असून अन्य १० जणांना फाशी ऐवजी जन्मठेप सुनावली आहे.

टाडा कोर्टाने या घटनेत १०० जणांना दोषी ठरवून पैकी ११ जणांना फाशी सुनावली होती. २० जणांना जन्मठेप तर बाकींना ३ जे १० वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रूपये दंड अशा शिक्षा सुनावल्या होत्या. या पैकी बहुतेकांनी सुप्रीम कोर्टात अपील केले होते. या साखळी बॉम्बस्फोटात २५७ नागरिकांचा मृत्यू झाला होता तर ७०० हून अधिक जखमी झाले होते.

Leave a Comment