लोकसेवा आयोग परीक्षेत निबंधही लिहा प्रादेशिक भाषेतून

नवी दिल्ली: राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी कोणत्याही प्रादेशिक भाषेच्या माध्यमातून उत्तरपत्रिका लोहू शकतात. इतकेच नव्हे तर इंग्रजीतून निबंध लिहिण्याची सक्तीही रद्द करण्यात येईल; अशी ग्वाही मनुष्यबळ विकास आणि प्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री नारायण सामी यांनी लोकसभेत दिली.

केंद्र सरकारने दि. ५ मार्च रोजी एक अधिसूचना जारी करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला मुख्य परीक्षेला इंग्रजी माध्यमाची सक्ती केली होती. मात्र या निर्णयावरून विरोधकांनी संसदेत सरकारला धारेवर धरले. त्याचा परिणाम म्हणून; या अधिसूचनेबाबत सरकारने पुनर्विचार केला असून प्रादेशिक भाषेतून ही परीक्षा देत येणार असल्याचे; सामी यांना स्पष्ट करावे लागले.

याशिवाय १०० गुणांची इंग्रजी निबधाची परीक्षाही रद्द करण्यात आल्याचे सामी यांनी सांगितले. त्या ऐवजी उमेदवाराने निवडलेल्या आणि घटनेच्या सूची ८ मध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही भाषेत २५० गुणांसाठी निबंध लिहिता येणार आहे.