नवी दिल्ली- टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा मालिकेतील अखेरचा सामना फिरोजशहा कोटला मैदानावर उद्यापासून सुरु होत आहे. कोटलावर पाहुण्यांना क्लिनस्वीप देण्याचा मालिकेत आघाडी घेतलेल्या टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. कोटलाचे मैदान गेल्या २७ वर्षांत भारतासाठी लकी ठरले आहे. या काळात येथे झालेल्या नऊ सामन्यांपैकी भारताने एकही लढत गमावली नाही. त्यामुळे या ठिकाणी ‘अजिंक्य’ राहण्याचा अनोखा विक्रम करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.
येथील कोटलाची खेळपट्टी कोरडी आणि भेगा असणारी आहे. ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी असेल. भारतीय फिरकीपटंच्या बळावर टीम इंडिया येथे ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिका ४-० ने जिंकू शकतो. १९८७ मध्ये विंडीजकडून पराभूत झाल्यानंतर या मैदानावर टीम इंडियाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. त्यानंतर झालेल्या १० पैकी ९ सामन्यांत भारताने विजयश्री मिळवली. २००८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच येथे एक सामना झाला होता. ती लढत अनिर्णीत राहिली.
या मैदानावर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सहा सामने झाले आहेत. येथे भारताने दोन वेळा कांगारूंविरुद्ध विजय मिळवला.कोटलाचे मैदान गेल्या २७वर्षांत भारतासाठी लकी ठरले आहे. येथे नऊ सामन्यांपैकी भारताने एकही लढत गमावली नाही. त्यामुळे उद्यापासून सुरु होत असलेल्या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड असून हा सामना जिंकत कांगारुला क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, गुरुवारी दोन्ही संघानी मैदानावर कसून सराव केला.