उपनिरिक्षक मारहाणप्रकरणी आमदार शरण

मुंबई: पोलीस उपनिरीक्षकाला विधिमंडळात मारहाण प्रकरणी निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना हक्कभंग प्रकरणी विधिमंडळात पाचारण केले असताना बहुजन विकास आघाडीचे ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कदम यांच्यासह शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल, राजन साळवी आणि भारतीय जनता पक्षाचे जयकुमार रावळ यांनी सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी या सर्व आमदारांना ३१ डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आले.

त्यांच्या निलंबनानंतर लगेचच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हे दाखल करून या आमदारांना अटक करण्यासाठी सापळा रचला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर सोमवारी अटक टळली. मात्र मंगळवारी ठाकूर आणि कदम हे स्वत: पोलिसांसमोर हजार झाले.

Leave a Comment