ब्रिटीश संशोधकाने शोधली थंड हवेवर चालणारी गाडी

पृथ्वीवरची ग्रीनेस्ट कार शोधण्याचा मान एका ब्रिटीश संशोधकाने मिळविला असून त्याने फक्त थंड हवेवर चालणारी कार बनविली आहे. पीटर डिअरमॅन याने आपल्याच २५ वर्षे जुन्या व्हॅक्सॉल नोव्हा गाडीचे या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रीनेस्ट कार मध्ये परिवर्तन केले आहे. या गाडीला पेट्रोल, डिझेल, वीज अथवा बॅटरी अशी कोणत्याच इंधनाची गरज नाही असा त्याचा दावा आहे. ६१ वर्षीय डिअरमॅन हा पूर्णवेळ संशोधक म्हणूनच कार्यरत आहे.

त्याने यासाठी स्टीम इंजिन संकल्पनेचा वापर केला आहे मात्र त्यात वाफेऐवजी थंड हवेचा उपयोग केला आहे. हवा उणे ३०० डिग्री तापमानाला नेली की ती द्रवरूप होते. हवेचा हा लिक्विड फॉर्म डब्यात भरून इंजिनात वाहून नेण्याची सोय त्याने केली व त्यासाठी बिअरचा डबा वापरला. इंजिनात ही हवा आल्यानंतर ती तापते व उकळू लागते. त्यातून गॅस तयार होतो व या गॅसवर पिस्टन चालविला जातो व गाडी चालू लागते. यात आपण काहीच जाळत नसल्याने धूर होत नाही तसेच प्रदूषण होण्याचीही शक्यता राहात नाही असे पीटरचे म्हणणे आहे.

या गाडीचे इंजिन हलके असल्याने स्वस्तात गाडी बनू शकते असाही त्याचा दावा आहे. विशेष म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपनी रिकार्डो यांनी या शोधाची दखल घेतली असून पुढच्या वर्षांत अशी कार बनविली जाईल असे जाहीर केले आहे. ही कंपनी इंजिन डिझायनिग क्षेत्रातील आहे.

Leave a Comment