चेन्नई – श्रीलंकेतील तामिळींच्या मुद्द्यावरून द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने लगेचच सीबीआयने गुरुवारी पहाटे द्रमुकचे नेते व करुणानिधींचे पुत्र स्टॅलिन यांच्या घरावर छापे टाकले. पहाटे साडेपाचच्या सुमारास सीबीआयचे अधिकारी स्टॅलिन यांच्या घरी धडकले आणि सर्व कुटुंबीयांना झोपेतून उठवून त्यांची चौकशी केली. पाठींबा काढल्याचा सूड उगविण्यासाठीच काँग्रेसने ही कारवाई केल्याचा आरोप होत आहे.छापे पडल्याचे कळताच द्रमुकचे शेकडो कार्यकर्ते स्टॅलिन यांच्या घराबाहेर जमले आणि त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली.
काही दिवसापूर्वीच टिव्ही निर्माते असलेले स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी परदेशी बनावटीची महागडी ‘हमर’ कार खरेदी केली होती. उदयनिधी यांनी या कारवरील आयात कर भरला नसल्याचे सीबीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे. काल अचानक या चौकशीसाठी ‘डीआरआय’ने सीबीआयचे सहकार्य मागितले. त्यानंतर काही क्षणातच याप्रकरणी गुन्हा दाखल करून सीबीआयने स्टॅलिन यांच्या घरावर छापे मारले. सीबीआयचे अधिकारी भल्या पहाटे स्टॅलिन यांच्या घरी पोहोचले. काही कळायच्या आतच अधिकाऱ्यांनी स्टॅलिन यांच्या घराची झाडाझडती सुरू केली. ‘हमर’ गाडी खरेदीची कागदपत्रे स्टॅलिन यांच्याकडे मागण्यात आली. तसेच गाडी घेण्यासाठी पैसे कुठून आले, याचीही चौकशी करण्यात आली.
द्रमुकने मंगळवारी रात्री यूपीए सरकारचा पाठिंबा काढल्याबाबतचे पत्र राष्ट्रपतींना दिले. त्यापाठोपाठ बुधवारी द्रमुकच्या पाचही मंत्र्यांनी राजीनामे दिले. त्यानंतरच्या काही तासांतच द्रमुकविरोधी सूडनाट्याला वेग आल्याचे सांगितले जाते. या कारवाईच्या मुद्द्यावरून गुरुवारी संसदेत राडा होण्याची शक्यता आहे.
मात्र ही कारवाई सरकारने घडवून आणल्याचा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी इन्कार केला. या कारवाईची वेळ अयोग्य असून या कारवाईमुळे सरकार बेचैन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अवेळी कारवाईला कोण जबाबदार आहे; यची चौकशी सरकार करेल; अशी ग्वाहीही पंतप्रधानांनी दिली.