सपाही सरकारला झटका देण्याच्या तयारीत

केंद्रातील युपीए सरकार द्रमुकने पाठिंबा काढल्यानंतर संकटात सापडले आहे. सरकारला बाहेरून पाठिंबा देणा-या समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पक्षाने या दोन पक्षांच्या हाती आता सरकारचे भवितव्य आहे. या दोन पक्षांची भूमिकाच येत्या काळात महत्वाची आणि निर्णायक ठरणार आहे. यातच आता सपाचे नेते रामगोपाल यादव यांनी ‘आज आम्ही सरकारच्या सोबत आहोत, उद्याचे माहित नाही’, असे सूचक विधान केल्याने कॉंग्रेसपुढील अडचणी वाढल्या आहेत. पाठिंब्याबाबतचा निर्णय पक्षाचे सुप्रीमो मुलायम सिंह यादव हेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोनच दिवसापूर्वी द्रमुकने केंद्रातील युपीए सरकारचा पाठींबा काढला आहे. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच काँग्रेसला समाजवादी पार्टीनेही झटका देण्याची तयारी चालवली आहे. समाजवादी पार्टीने काँग्रेसला आत्मचिंतनाचा सल्ला देताना ‘आज आम्ही सरकारच्या सोबत आहोत, उद्याचे माहित नाही’, असा सुचक इशाराही दिला आहे. यादव यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका करताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची स्तुती केली. ते म्हणाले, ‘गुजरातमधील दंगल सोडली तर एनडीए सरकार युपीए सरकारपेक्षा अधिक चांगले होते. युपीए सरकार वारंवार चुका करत आहे. आघडीचा धर्म निभावला जात नाही. घटक पक्षांना बेदखल केले जात आहे. त्यामुळेच घटक पक्षांची नाराजी वाढत चालली आहे. द्रमुकने साथ सोडण्याचे तेच प्रमुख कारण आहे.’

पाठिंब्याबाबतचा निर्णय पक्षाचे सुप्रीमो मुलायम सिंह यादव हेच घेतील. सरकारला असलेल्या पाठिंब्याबाबत विचारले असता यादव म्हणाले, ‘ सरकारला आज आमचे समर्थन आहे, भविष्याबद्दल मला माहित नाही.’