दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावला ‘येडा’

पुणे: दिग्दर्शक किशोर पांडुरंग बेळेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला दुसरा मराठी सिनेमा ‘येडा’ मागील काही महिन्यांपासून या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. १९ एप्रिल २०१३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार्‍या या सिनेमाच्या टिमने सामाजिक बांधिलकीचे भान राखत या सिनेमाच्या फर्स्टलुक आणि संकेतस्थळाच्या अनावरणादरम्यान दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी देण्याची घोषणा केली आहे.

सतिश मोरे, स्नेहा तांबे, गिरीश साळवी, लक्ष्मण साळुंखे आणि आदित्य शर्मा यांची निर्मिती असलेल्या मैत्र एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘येडा’ या सिनेमाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन मोहम्मदभाई लोखंडवाला यांच्या हस्ते करण्यात आले. वितरक समीर दिक्षित यांनी ‘येडा’च्या प्रोमोजचे उद्घाटन केले. ‘येडा’मध्ये शीर्ष भूमिका साकारणारे अभिनेते आशुतोष राणा यांच्यासह दिग्दर्शक किशोर बेळेकर, सतिश पुळेकर, अनिकेत विश्वासराव, प्रज्ञा शास्त्री, किशोरी शहाणे, छायालेखक रईस अन्सारी तसेच निर्माते व तंत्रज्ञांची संपूर्ण टिम उपस्थित होती.

बॉलीवूडपासून मराठी सिनेसृष्टीपर्यंत कोणत्याही नवीन सिनेमाचा भव्यदिव्य प्रिमियर शो करण्याची परंपरा आहे. पण येडा’चा मात्र प्रिमियर होणार नाही. महाराष्ट्रात दुष्काळ पडला असल्याने ‘येडा’च्या प्रिमियरवर खर्च न करता एक साधा शो मान्यवरांना दाखवण्यात येणार असल्याचे निर्माता सतिश मोरे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. प्रिमियरचा खर्च वाचवून जी रक्कम उरणार आहे ती मुख्यमंत्री सहाय्य निधीच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचेही सतिश मोरे म्हणाले. प्रेक्षक हे आमचे मायबाप असून त्यांच्यासाठी येडा’च्या टिमकडून खारीचा वाटा देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आशुतोष म्हणाले की, मराठी सिनेमा करण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती; पण एखाद्या चांगल्या पटकथेच्या प्रतिक्षेत होतो. दिग्दर्शक किशोर बेळेकरांनी ‘येडा’च्या निमित्ताने स्क्रीप्ट ऐकवल्यावर मराठीत पदार्पण करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे जाणवले आणि हा सिनेमा स्वीकारला. यात मी अप्पा कुलकर्णी नावाचे पात्र साकारले असून त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. लुकवर, भाषेवर, अभिनयावर, संवादफेकीवर आणि एकूणच संपूर्ण देहबोलीवर मेहनत घेऊन मी अप्पा कुलकर्णी साकारला आहे. यात मराठीतील दिग्गज आणि बुद्धिमान कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने भाषेची अडचण कुठेच भासली नाही. एकूणच हा थरारपट प्रेक्षकांना एक वेगळा आनंद देऊन जाईल.’’

Leave a Comment