‘गोविंदा’ चित्रपटाचा मुहूर्त

पुणे: गेल्या काही वर्षात दहिहंडी उत्सवाचे रूप बदलले आहे. उत्सवाच्या आडून केलं जाणारं राजकीय शक्तीपदर्शन, उंच थराच्या बक्षिसासाठी राजकीय पक्षांची सुरू असलेली अहमहमिका; या सार्‍यात दहिहंडी फोडणार्‍या मंडळांची सुरू असलेली रस्सीखेच; एकूणंच उत्सवाच्या निमित्ताने त्यात शिरलेलं राजकारण यावर भाष्य करणारा ‘गोविंदा ’ हा मराठी चित्रपट लवकरच पदर्शित होणार आहे.

नुकताच मुंबईत या चित्रपटाचा मुहूर्त शंकर महादेवन यांनी गायलेल्या गणेश वंदनेच्या ध्वनिमुद्रणाने संपन्न झाला. शंकर महादेवन यांनी आपल्या दमदार व तरल आवाजात गणेशाचं हे गाणं गायलं आहे. ‘विघ्नविनाशक करूणासागर मोरया’ असे या गाण्याचे बोल आहेत. युवा संगीतकार रोहन प्रधान यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. विलास वाघमोडे निर्मित आणि आत्माराम धर्णे दिग्दर्शित या चित्रपटात स्वप्नील जोशी, गिरीजा जोशी, अरूण नलावडे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी असे अनेक दिग्गज कलाकार काम करणार आहेत.

गणेशाचं गाणं गाण्याचा योग दुसर्‍यांदा मिळाल्याचा आनंद व्यक्त करंत शंकर महादेवन यांनी चित्रपटातील संपूर्ण टीमच्या सहकार्याचाही आवर्जून उल्लेख केला. शंकर महादेवन यांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव हा शिकण्यासारखा असल्याचं मत संगीतकार रोहन प्रधान यांनी व्यक्त केलं.

टीव्हीवर लोकपिय ठरलेल्या ‘कृष्ण’ या मालिकेतील कृष्ण अर्थातच स्वप्नील जोशी हा परत एकदा कृष्णाच्याच भूमिकेत म्हणजे गोविंदाच्या रूपाने पेक्षकांसमोर येणार आहे. कृष्णाशी आपला ऋणानुबंध असल्यानेच हे योग जुळून येत असावेत असं सांगत चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल उत्सुक असल्याचे स्वप्नीलने सांगितले. दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळाल्याचा आनंद अभिनेत्री गिरीजा जोशी हिने व्यक्त केला.

आपल्याला सण उत्सवांची समृद्ध परंपरा लाभली आहे. परंतु सण साजरा करण्यामागचा मूळ उद्देश मागे पडत चालला आहे. दहिहंडी सणाचं स्वरूप ही बदलायला लागल असून उंच दहिहंडी व ती फोडण्यासाठीच जीवघेणी स्पर्धा; असंच चित्र हल्ली पाहायला मिळू लागलं आहे. जीव धोक्यात घालून उंच थराच्या हंडी फोडणार्‍या गोविदांचा विचार फारसं कोण करत नाही. त्यातूनच ही कथा सुचल्याचे निर्माते विलास वाघमोडे यांनी सांगितले. दहीहंडी फोडणार्‍या गोविदांचा थरार आणि त्यासाठी त्यांना करावी लागणारी कसरत या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.

Leave a Comment