अंकुश बनलाय फोटोग्राफर

पुणे: चित्रपट किंवा नाटकामध्ये एखादी भूमिका मनापासून वठवल्यानंतर त्या भूमिकेचा प्रभाव कलाकारावर बघायला मिळतो. एखाद्या विशिष्ट भूमिकेवरुन किंवा पात्रावरुन कलाकार ओळखले जाण्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. आणि अशा विशेष भूमिकेसाठी विशेष मेहनत घेणारे, अभ्यास करणारे कलाकारही आपल्याकडे आहेत. मराठी फिल्मसृष्टीमध्ये भूमिकांमधील वैविध्य जपणारा आणि त्यासाठी अशीच विशेष मेहनत घेणारा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. आपल्या प्रत्येक चित्रपटातील भूमिकेमध्ये, लूकमध्ये वेगळेपणा जपण्याचा अंकुश नेहमीच प्रयत्न करतो. अशाच वेगळ्या भूमिकेत अंकुश आता बघायला मिळणार आहे ‘संशयकल्लोळ’ या चित्रपटामधून.

श्री स्वामी समर्थ पिक्चर्स निर्मित आणि विशाल इनामदार दिग्दर्शित ‘संशयकल्लोळ’मध्ये अंकुश एका छायाचित्रकाराच्या भूमिकेत आहे. आजच्या काळातला फॅशन ट्रेंड जपणारा आणि फॅशन स्टाईलचं फोटोशूट करणारा फोटोग्राफर यात अंकुशने रंगवलाय. हा चित्रपट करताना अंकुश त्या भूमिकेसोबतच फोटोग्राफीच्याही प्रेमात पडला आणि त्याला कॅमेर्‍याचं वेड लागलं. या प्रेमापोटीच मग चित्रपट पूर्ण झाल्यानंतरही जेव्हा प्रसिध्दीसाठीच्या फोटोशूटची तारीख नक्की झाली तेव्हा अंकुशने स्वत:च कॅमेरा हाती घेतला.

‘संशयकल्लोळ’च्या प्रसिध्दीसाठी वापरण्यात येणारे पोस्टर, जाहिराती, होर्डिंग्ज् यासाठीच्या फोटोशूटसाठी अंकुशने स्वत: अनेक फोटो क्लिक केले. यामध्ये त्याने चित्रपटातील कलाकार पुष्कर श्रोत्री, गौरी निगुडकर, मृणाल देशपांडे या कलाकारांना पोझ समजावून सांगत फोटोग्राफी केली. अंकुशच्या मते हा सर्वच अनुभव त्याच्यासाठी खूप अनोखा आणि एक्सायटिंग असाच होता.

‘संशयकल्लोळ’ मधील भूमिका करताना त्याने फोटोग्राफीचे व त्या तंत्राचे बारकावे शिकून घेतले होते. त्यात कॅमेरा पकडण्याचे तंत्र, त्यासाठी लागणार्‍या लायटिंगचा अभ्यास, लेन्स, फोकस अशा अनेक नव-नव्या बाबी तो या निमित्ताने शिकला. हाच अभ्यास त्याने या फोटोशूटच्यावेळी अमलात आणला.

नवरा-बायकोच्या सुंदर नात्यामध्ये संशयामुळे उडणारा गोंधळ आणि नात्यांचा होणारा गडबडगुंडा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या धमाल चित्रपटाची कथा विशाल इनामदार यांनी लिहिली असून पटकथा विशाल इनामदार, राजेश कोलन आणि विजय पटवर्धन यांनी लिहिली आहे तर संवाद संजय मोने आणि विजय पटवर्धन यांचे आहेत. अंकुश चौधरी, पुष्कर श्रोत्री, संजय खापरे, मृण्मयी देशपांडे, गौरी निगुडकर, सिध्दार्थ चांदेकर, रिमा लागू, ओंकार गोवर्धन, क्षिती जोग, विजय पटवर्धन, सुलेखा तळवलकर, पूजा सावंत, अभिजीत साटम, अश्विनी कुलकर्णी , राजेश कोलन, श्रीरंग देशमुख, विशाल इनामदार, शुभांगी दामले, श्रीपाद जोशी, निखिल नेरुरकर, आशुतोष वाडेकर अशा दिग्गज कलाकारांची फौज असणाऱया ‘संशयकल्लोळ’ या कौटुंबिक विनोदीपटाचं दिग्दर्शन विशाल इनामदार यांनी केलं आहे.

श्री स्वामी समर्थ पिक्चर्स निर्मित ‘संशयकल्लोळ’ येत्या ५ एप्रिलपासून पेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Leave a Comment