रामदासांवर ‘राज’कीय प्रभाव

पुणे: आजपर्यंत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वळचणीत राहून राजकारण केलेले अणि आता राजकीय हतबलतेतून भाजप शिवसेना युतीच्या कुशीत शिरलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कितीही लाखोल्या वाहत असले तरी त्यांच्या राजकारण शैलीची भुरळ आठवले यांना पडत आहे. विशेषत: युवा वर्गाकडून राज यांना मिळणारा प्रतिसाद आठवले यांना प्रभावित करीत असून युवकांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थी चळवळीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय आठवले यांनी घेतला आहे.

इंदू मिल प्रकरणावरून राज आणि आठवले यांच्यात चांगलेच वाग्युद्ध जुंपले. एकमेकांवर टीका काण्यचॆ एकही संधी दोघे गमावत नाहीत. मात्र राज यांच्या राजकारणाच्या शैलीने आठवले यांच्यावर प्रभाव टाकला आहे. पुणे येथे झालेल्या एका बैठकीत आठवले यांनी राज यांना युवा वर्गाकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा उल्लेख केला. यावेळी झालेल्या चर्चेत राज यांनी शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेची उभारणी ज्या जोमाने केली त्यामुळे युअक वर्गात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा करिष्मा निर्माण झाल्याचा आवर्जून उल्लेख झाला. रिपब्लिकन पक्षाशी संबधित असलेल्या काही जणांनी बहुजन विद्यार्थी परिषदेसारख्या विद्यार्थी संघटना चालविल्या असल्या तरीही पक्षाची अधिकृत अशी विद्यार्थी संघटना नसल्याचा उहापोह झाला.

या चर्चेचे फलित म्हणून आठवले यांनी विद्यार्थी संघटना उभारण्याचे मनावर घेतले. त्याच्या नियोजनासाठी मुंबईच्या एमआयजी क्लब येथे आठवले यांच्या उपस्थितीत निवडक कार्यकर्त्याची बैठक पार पडली. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्षाची विद्यार्थी संघटना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे माजी उपाध्यक्ष आणि आता रिपब्लिकन पक्षात आलेले अ‍ॅड. मंदार जोशी यांच्यावर या संघटनेच्या उभारणीची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

या बैठकीला स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रा. सुनील मगरे, बहुजन विद्यार्थी परिषदेचे चंद्रशेखर कांबळे, आरपीआयचे प्रवीण मोरे, गौतम सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. जोशी यांच्यावर संघटनेच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असून संघटनेचे नाव आणि इतर पदाधिकारी नंतर निवडण्यात येतील. संघटना उभारणीसाठी अ‍ॅड. जोशी यांना सहकार्य करण्याचे आवाहन आठवले यांनी उपस्थितांना केले.

Leave a Comment