विधिमंडळात आमदारांकडून पोलीस अधिकाऱ्यास मारहाण

विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना आवारात सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना काही आमदारांकडून मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. आमदारांच्या या मारहाणीमुळे विधिमंडळ परिसरात तैनात पोलिसांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी आज, मंगळवारी दुपारी विधिमंडळ
परिसरात जाऊन नाराज पोलिसांची भेट घेतली

नालासोपाऱयातील बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार रावळ यांच्यावर सूर्यवंशी यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

वांद्रे-वरळी सागरी सेतूमार्गावर सूर्यवंशी यांनी आमदार ठाकूर यांच्यासोबत सोमवारी गैरवर्तणूक केली आणि त्यांच्या चालकाकडून दंड वसूल केला. त्यानंतर ठाकूर यांनी सूर्यवंशी यांच्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावानंतर राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सूर्यवंशी यांना विधीमंडळात येण्याचे आदेश दिले. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर सूर्यवंशी हे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले होते. सूर्यवंशी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसल्याचे कळताच या आमदारांनी तिथे जाऊन त्यांना मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केल्यामुळे ते तिथे बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलविण्यात आले

Leave a Comment