ब्रिटीश महिलांना सावधानतेचा इशारा

लंडन दि.१९ – मध्यप्रदेशात स्वीस महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर ब्रिटीश सरकारने आपल्या देशातील महिलांना भारतात पर्यटनासाठी जात असाल तर एकट्या जाऊ नका असा सावधानतेचा इशारा दिला असल्याचे समजते. भारतात गेल्या कांही काळापासून महिला आणि तरूण मुलींवर बलात्कार आणि लैगिक अत्याचारांसारख्या घटना घडण्याचे प्रमाण वेगाने वाढले असल्याने हा इशारा दिला गेल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वीही ब्रिटीश महिलांवर गोवा, दिल्ली, बंगलोर आणि राजस्थान येथे अशा प्रकारचे प्रसंग ओढवले आहेत. बरेचवेळा या महिलांना छेडछाड, उगीचच अंगाशी लगट करणे, अश्लील बोलणे अथवा मागे लागणे यासारख्या प्रसंगाना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ब्रिटीश महिलांनी एकाकी समुद्र किनारे अथवा एकांत जागी एकट्याने जाऊ नये तसेच भारतात वावरताना तेथील स्थानिक पोषाख घालावेत असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment