ऐसे कैसे झाले भोंदू

धर्माच्या ठेकेदारांनी केलंय धर्माचे विडंबन. सामान्य माणसाला धर्म म्हणजे काय हे कळले नाही तर आपण त्यांना क्षमा करू शकतो कारण शेवटी ते अज्ञ असतात पण रात्रंदिन प्रवचने झोडणार्‍यांनाच जर धर्माची कल्पना कळत नसेल तर धर्माचे यापरते कोणते दुर्दैव असेल ? गरीब माणसाच्या दु:खावर फुंकर घालतो तो धर्म की त्यांच्या जखमांवर मीठ चोळतो तो धर्म ? याचे उत्तर कोणीही देईल. पण आसाराम बापूंना कोणीच ही व्या‘या सागितलेली दिसत नाही. म्हणूनच महाराष्ट्रातली जनता पाण्याची टंचाई सहन करीत असताना या बापूंना हजारो लोकांशी एकदम रंगपंचमी साजरी करण्यासाठी हजारो लीटर पाणी वाया घालवताना थोडासाही संकोच वाटत नाही. अशा लोकांना साधू कोण म्हणेल ? ते तर साधूंच्या वेषातले भोगी आहेत. आसाराम बापू आणि त्यांचे शिष्य आपल्या आश्रमात नगरपालिकेकडून हजारो लीटर पाणी घेऊन होली खेळत आहेत. त्यांना या प्रमादाची जाणीव दिलेलेही आवडत नाही म्हणून ती जाणीव देणार्‍या पत्रकारांवर त्यांचे अनुयायी चक्क हल्ले करीत आहेत. आपण काय करीत आहोत हे त्यांना कळत नाही.

महाराष्ट्रात होळीला शिमगा म्हणतात आणि त्या दिवशी रंग न खेळता हुताशनी पेटवून त्या भोवती अभद्र बोलत बोंब मारतात. हा खेळ नेमका काय आहे हे कोणाला नेमकेपणाने सांगता येत नाही. पण काही लोकांच्या मते ते यज्ञसंस्थेचे विडंबन आहे. आर्य संस्कृतीत अग्नी पेटवून त्याच्या भोवती जमून मंत्र म्हणतात आणि त्यात काही आहुती टाकतात. पण हा प्रकार ज्यांना मान्य नाही त्यांनी या यज्ञाचे विडंबन करायचे ठरवले. त्यांनी असाच अग्नी पेटवला. त्यासाठी चोरी करून गवर्‍या जमा केल्या. आणि मंत्रांच्या ऐवजी अभद्र बोलत बोंबा मारायची पद्धत पाडली. उत्तर भारतात याच दिवशी रंग खेळतात. आपल्या चित्रपटसृष्टीवर या उत्तर भारतातल्या संस्कृतीचा मोठा पगडा आहे. त्यामुळे चित्रपटांत होळीलाच रंग खेळला जात असल्याचे दाखवले जाते. खरे तर ही एक विसंगती आहे. होळी या शब्दाचा अर्थ जाळणे, राख करणे हा असतो पण उत्तर भारतातले लोक या ज्वलनाच्या दिवशीच होळी खेळतात. चित्रपटात तसेच दाखवतात आणि कोणत्याही गोष्टीचे अंधानुकरण करण्यात पटाईत असलेले आपण सारे लोकही होळीलाच रंग खेळायला लागलो आहोत.

आसाराम बापू यांच्या आश्रमात असाच होळीचा सण चालू झाला आहे. खरे म्हणजे होळी तर अजून दूरच आहे आणि रंगपंचमीही त्यानंतर आहे पण बापूंच्या अनुयायांना बापू आले तो दिवसच होळीचा वाटायला लागला आहे. साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा, असे मराठीत म्हणतात. पण बापूंच्या शिष्यांना बापू येती घरा तो शिमगा वाटतो. अशा या बापूंच्या अनुयायांनी म्हणजे नाशिक, नवी मुंबई आणि नागपूरच्या अनुयायांनी प्रत्यक्षात होळी लांब असली तरी बापूंच्या आगमनालाच ती साजरी करण्याचा घाट घातला. बापू हे काही सामान्य व्यक्ती नाहीत. त्यांच्याशी होळी खेळली पाहिजे कारण तशी ती खेळल्याने आपल्या आयुष्याचे कायमचे कल्याण होणार अशी खात्री या शिष्यांना वाटते. बापूंनाही होळी खेळायला आवडते. बापू म्हटले की तोबा गर्दी आलीच मग एवढ्या गर्दीशी बापू एकटेच होळी कशी खेळणार ? बापू हे मोठे हायटेक साधू आहेत. आपल्या समाजात काही साधू साधे आहेत. काही साधू पंचतारांकित आहेत. आचार्य रजनीश यांच्या सार‘या साधूंमुळे पंचतारांकित साधू हा शब्द निर्माण झाला.

आपल्या डोळयासमोर साधू म्हटले की तुकाराम महाराज उभे राहतात. साधा वेष केलेेले. पण हे पंचतारांकित साधु ऐषारामात राहणारे. एकेकाळी फोन ही मोठी चैनीची वस्तू होती आणि ती मोठ्या श्रीमंत व्यापार्‍यांकडेच असायची पण या साधूंकडे फोन, चार चाकी वाहने असत. त्यांची वस्त्रे भगवीच असत पण ती अतीशय भारी तलम रेशमाची असत. संत गाडगे महाराजांशी तुलना केली तर पूर्ण विसंगत चित्र दिसायचे. म्हणून त्यांना पंचतारांकित साधू म्हटले जायला लागले. त्या काळात असे साधू फार कमी असायचे पण आता बघावे तर काय ? सगळेच साधू श्रीमंत झाले आहेत. त्यांची संपत्ती आणि मालमत्ताही कोटयवधींच्या आहेत. खरे खुरे साधे साधूच अपवाद झाले आहेत. आसाराम बापू यांनी हीही मर्यादा ओलांडली आहे. ते हायटेक साधू झाले आहेत. त्यांनी होळीचे नवे तंत्र शोधून काढले आहेत. ते व्यासपीठावर उभे असतात आणि त्यांच्या हातात हायप्रेशरने हजारो लीटर पाणी एकदम उडवण्याची सोय असलेला पंप असतो. त्याच्या साह्याने ते तिथे जमलेल्या आपल्या भक्तांवर एकदमच रंगीत पाणी उडवतात. त्यांच्या रंगाचा हजारो भक्तांना एक समयावच्छेदे करून लाभ होतो. ते सारे जीव तृप्त होतात. आपल्या जीवनातला एक फारच पुण्याचा योग आज चालून आला आहे असे त्यांना वाटते. पण या कामात हजारो लीटर पाणी वाया जाते याचे ना बापूंना भान ना शिष्यांना चिंता.
महाराष्ट्रातले लाखो लोक घागरभर पाण्याला मोताद आहेत. घागर दोन घागरी पाणी मिळावे म्हणून ते तास दोन तास टँकरची वाट पहात असतात. आपण हजारो लीटर पाणी वाया घालवत आहोत. ही आपली चैन त्या गरीब लोकांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. खरे तर या बापूंनी आणि बाबांनी या दुष्काळग‘स्त लोकांसाठी काही तरी केले पाहिजेे. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, की धर्म धर्म म्हणजे दुसरे तिसरे काही नाही. माणसाची सेवा करणे हाच धर्म आहे. शिवभावाने जीवाची सेेवा करणे म्हणजेच धर्माचरण. तुकाराम महाराजांनी तर त्यापेेक्षा सोप्या भाषेत म्हटले आहे, ‘जे का रंजले गांजलेश, त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.’ ज्याला मनुष्यमात्राचे दु:ख समजत नाही तो कसला आलाय साधू. तो तर भोंदू होय. आसाराम बापू सारखे बाबा हे संत म्हणवण्याच्याही लायकीचे नाहीत. ते तर धर्माचा व्यापार करून पैसा कमावणारे व्यापारी आहेत. त्यांनी धर्म विकायला काढला आहे. गमतीचा भाग असा की त्यांच्या या अनुयायांच्याही डोक्यात एवढा विचार येत नाही की, आपण आपल्याच धर्मबाधवांच्या जखमांंवर डागण्या देतोय. या लोकांना त्यांच्या प्रमादाची जाणीव दिलेलीही आवडत नाहंी. ती करून देणार्‍या पत्रकारांवर ते हल्ले करीत आहेत.

Leave a Comment