कांगारुंचे लोटांगण भारत ३-० ने आघाडीवर

मोहाली- कमालीची रंगतदार ठरलेली तिसरी कसोटी अखेर टीम इंडियाने सहा विकेटने जिंकली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सलग तीन चौकार ठोकून विजयावर शिक्‍कामोर्तब केला. शेवटच्‍या काही षटकांत चेंडू आणि धावांचे गुणोत्तर बरोबर झाल्‍यानंतर सामना अनिर्णीत राहतो की काय अशी परिस्थिती झाली होती. त्‍यातच सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली बाद झाल्‍यानंतर भारतीय तंबूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, धोनीने आपल्‍या खांद्यावर जबाबदारी घेत अखेर टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी रवींद्र जडेजा, प्रग्यान ओझा आणि आर. अश्विन या फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना एकापाठोपाठ पॅव्हेलियन पाठविले. ओझाने नॅथन लिऑनला धोनीकरवी झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असूनही कर्णधार मायकेल क्लार्क मैदानात उतरला. क्लार्कने थोडाफार जम बसविण्याचा प्रयत्न केला. पण, रवींद्र जडेजाने मालिकेत पाचव्यांदा त्याला बाद करण्याची कामगिरी केली. त्यापाठोपाठ हेन्रिकसही जडेजाकडेच झेल देऊन बाद झाला. सिडलला ओझाने त्रिफळाबाद केले. ब्रॅड हॅडीन, मिशेल स्टार्क आणि झेव्हियर डोहर्टी यांनी काही षटके खेळून काढत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. अखेर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २२३ धावांत संपुष्टात आला. भारताकडून जडेजा आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी तीन, तर ओझा आणि अश्विनने प्रत्येकी दोन बळी मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासमोर भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरवात करीत आघाडी मिळवून दिली. भारताने 4 बाद 136 धावा केल्या. त्यामुळे भारताला 6 गडी राखून सहज विजय मिळविता आला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेवर आपली मोहोर उमटवली आहे.