फिंगरप्रिंटने अनलॉक होणार अॅपलचे आयफोन

लंडन दि. १८ – आयफोन मालकाच्या फिगरप्रिंटनेच अनलॉक होऊ शकतील असे नवे तंत्रज्ञान अॅपलने विकसित केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अॅपल फिगरप्रिंटचा वापर करत असताना अन्य कंपन्यांनी डोळ्यांच्या बाहुलीचे स्कॅनिग करून अनलॉक होणारे तसेच आवाजाची ओळख पटवून अनलॉक होणारे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.

गेल्या वर्षी अॅपलने २३५ दशलक्ष पौंड खर्चून ऑथेनटिक या  बायोमेट्रिक सिक्युरिटी फर्मची खरेदी केली तेव्हाच अॅपल ही योजना आणणार असल्याचे अंदाज वर्तविले गेले होते. केजीआय सिक्युरिटीचे अॅनालिस्ट मिग ची को  म्हणाले की अॅपल आयफोनसाठी हे तंत्रज्ञान या महिन्यातच वापरेल असा अंदाज आहे.

अॅपलची प्रतिस्पर्धी मानल्या जात असलेल्या सॅमसंगने गेल्यावर्षीच त्यांच्या एस थ्री साठी फेस अनलॉक तंत्रज्ञानाचा वापर केला असून नुकत्याच न्यूयॉर्क येथे सादर करण्यात आलेल्या एस फोर मध्ये हेच तंत्रज्ञान अधिक प्रगत करून वापरले गेले आहे.