मुरूड जंजिरा

सुंदर समुद्र किनार्या ने नटलेले मुरूड आणि समुद्रात दिसणारा, जगभरातील समुद्र किल्ल्यात बळकट मानला जाणारा जंजिरा ही पर्यटकांची भेट देण्याची आवडीची ठिकाणे आहेत. अगदी एक दोन दिवसांच्या सुटीतही या सहलीचा आनंद घेता येणे शक्य होत असल्याने पर्यटकांची येथे नेहमीच वर्दळ असते. मुरूड हे पारंपारिक कोकणी गांव आहे. निळाशार समुद्र आणि स्वच्छ लांबलचक समुद्र किनारा असलेले हे छोटे गांव पायी पायी हिडण्याचेच गांव आहे. मुरूडला मस्त मासे, तांदळाची भाकरी, सोलकढीवर ताव मारायचा आणि बोटीतून जांजिरा पाहायला जायचे हा सगळ्यात चांगला पर्याय आहे.
murud-janjira
जंजिरा हा महाप्रचंड समुद्री किल्ला लंबवर्तुळाकर बेटावर बांधला गेला आहे. १५ व्या शतकांत हा किल्ला लाकडात त्यावेळच्या राम पाटील या कोळ्याने बांधला तो आपल्या बांधवांचे समुद्री चाचे आणि चोर लूटारूंपासून संरक्षण व्हावे म्हणून.त्याचे नाव होते मेढे कोट. राम पाटलाचा शूरपणा आणि  समुद्रातले किल्याचे स्थान अहमदनगरच्या निजामाच्या डोळ्यातून सुटले नाही आणि त्याने आपला हबशी सरदार पीरखान याला हा किल्ला जिंकून घेण्यासाठी पाठविले. गड इतका भककम होता की सहजी जिंकणे अवघड म्हणून या हबशींनी व्यापार्यांसचे सोंग घेतले, गडात आश्रय मागितला आणि व्यापार्यां च्या रूपात आलेल्या आणि पेट्यांतून दडवून आणलेल्या सैनिकांनी राम पाटील कोळी आणि साथीदारांना दगलबाजीने ठार करून गड बळकावला असा इतिहास आहे.
murud-janjira1
त्यानंतर बुर्हारणखान सरदाराने हा गड पुन्हा बांधला. २२ एकरावरचा हा किल्ला दगडात बांधला  आणि नंतर हा गड सिद्दी म्हणजे हबश्यांच्याच ताब्यात राहिला. मुरूडपासून जेट्टीवरून बोटी सुटतात त्यातून या किल्ल्यात जाता येते. या किल्याचे नांव ठेवले होते जजीरा म्हणजे बेट. नंतर त्याचे जंजिरा झाले असेही सांगितले जाते. या किल्याचे मुख्य दार राजापुरीकडे आहे तर गुप्त दरवाजा खुल्या सम्रुदा्रात आहे. १९ तटबंद्या असलेला जंजिरा अनेक देशी विदेशी तोफा आजही बाळगून आहे.
murud-janjira4
एकेकाळी जिताजागता असलेला हा किल्ला आता पडीक झाला आहे. राजांचे महाल, अधिकाऱ्यांच्या राहण्याच्या जागा, मशीद, महाप्रचंड अशी गोड्या पाण्याची दोन तळी येथे होती आता फक्त अवशेष आहेत. तटबंदीच्या भितीवर वाघासारखा प्राणी कोरला असून त्याने हत्ती पकडला आहे. मुख्य दरवाजांवर अशोकचक्रे, खेळणारे हत्ती, सिह कोरलेले आहेत. जंजिऱ्यांच्या नबाबाचा पॅलेस मुरूड मध्ये असून शेवटचा राजपुत्र रोबी फिलिप न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहे असे सांगितले जाते.
murud-janjira2
मुरूडच्या पॅलेसमध्येही गुप्त दरवाजे, लपण्यासाठी तसेच सुटका करून घेण्यासाठी अनेक वाटा पळवाटा असून त्याचे बांधकाम भक्कम आहे. जंजिरा जिकण्यासाठी पोर्तुगीज, ब्रिटीश व मराठयांनी वर्षानुवर्षे प्रयत्न केले पण हा अजिंक्यच राहिला. आपल्या शिवाजी राजांनीही हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या सरदारांनी तटाला शिड्याही लावल्या होत्या पण ऐनवेळी कुमक न मिळाल्याने हा प्रयत्न फसला. संभाजी राजांनीही किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी गुप्तपणे भुयार खोदले होते पण हाही प्रयत्न अयशस्वीच झाला.
murud-janjira3
जंजिरा पाहून आल्यानंतर थंडगार कोकम सरबताचा आस्वाद घेतानाच सूर्यास्ताची वेळ असेल तर शांतपणे किनार्यांवर बसून समुद्रात बुडणारा सूर्य मनसोक्त अनुभवावा. नंतर रात्रीच्या जेवणावर ताव मारावा आणि शांतपणे विश्रांती घ्यावी. मुरूड गावात खाजा नावाचा खाद्यप्रकार फार चांगला मिळतो. तो जरूर आणावा आणि आपल्या सग्यासोयऱ्यांत वाटावा.

मुरूडला मुंबई पुण्याहून जाण्यासाठी रस्तामार्गही चांगला आहे आणि हा रस्ताही अतिशय सुंदर आहे. नारळी, पोफळी, आंबे आणि अनेक ओळखी अनोखळीची वृक्षसंपदा रस्त्यावर स्वागतासाठी सज्ज आहे. वळणावळणाचे घाट , लाल मातीचा सुंदर रस्ता सोबतीला असल्यावर हा हा म्हणता हा प्रवास संपतो. तो एकदा करून तर पहा.

Leave a Comment