माऊथ वॉश मुळे होऊ शकतो तोंडाचा अल्सर

मुंबई दि. १६ – तोंडातील बॅक्टेरिया मरावेत आणि दिवसभर श्वासाला सुगंध राहावा यासाठी माऊथवॉश बनविणार्यां कंपन्या सातत्याने जाहिराती करून ग्राहकांना हे माऊथवॉश वापरण्यास भाग पाडत असतानाच माऊथवॉशच्या रोजच्या वापराने तोंडाचा अल्सर होऊ शकतो तसेच दातांचा रंग बदलतो, जिभेची चव जाते असेही त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे तज्ञ दंतवैज्ञांचे म्हणणे आहे.

शहरी भागात माऊथवॉशचा वापर करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. या विषयी माहिती देताना सरकारी डेंटल कॉलेजचे डीन डॉ. मानसिंग पवार म्हणाले की माऊथवॉश वापरणाऱ्यांपैकी ३० टक्के लोकांना तोंडाचे इन्फेक्शन होण्याचे त्रास होत असल्याचे लक्षात आले आहे. तोंड कोरडे पडणे, चव जाणे, जीभेची संवेदना जाणे अशी लक्षणे या लोकांत दिसत आहेत. माऊथवॉश हे रसायन असल्याने त्याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. हे माऊथवॉश अधिक तीव्र असतील तर त्याचे दुष्परिणाम अधिक आहेत.

माऊथ वॉश वापरणाऱ्या अनेकांचे दात कॅल्शियम कोटिंग गेल्याने झिजल्याचे दिसून आले असून जिभेच्या मऊ आणि नाजूक स्नायूंवरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. परिणामी पदार्थांची चव कळेनाशी होत आहे. अनेकांना अल्सर झाले आहेत. माऊथवॉश हे जगभरच कौंटरवर विकले जातात व त्यामुळे त्यावर नियंत्रण आणणे अवघड आहे असेही तज्ञांचे म्हणणे आहे. माऊथ वॉश रोज वापरू नयेत तसेच वापरताना ते थोडे सौम्य करून घ्यावेत म्हणजेच त्यात पाणी घालून डायल्यूट करावेत असा तज्ञांचा सल्ला आहे.

आज भारतात ओरल केअरची बाजारपेठ तब्बल ५५०० कोटींची असून दरवर्षी ती १८ ते १९ टक्क्यांनी वाढते आहे. त्यात माऊथवॉशचा हिस्सा १०० ते १५० कोटींचा असून त्यातही दरवर्षी २५ ते ३० टक्के वेगाने वाढ होत आहे. यामुळे भविष्यात अधिक संख्येने ग्राहकांना अनेक व्याधींना सामोरे जायची वेळ येऊ शकते असा इशाराही तज्ञ जाणकारांनी दिला आहे.

Leave a Comment